गडचिरोली : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री चंद्रपूर मार्गावरील महिला महाविद्यालयाजवळ घडली.
मंगेश राजेंद्र नैताम (२५) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी मंगेश काही कामानिमित्त गडचिरोली जिल्हा मुख्यालयात आला होता. काम आटोपून रात्री तो एमएच-३३/एन- ४५३५ क्रमांकाच्या दुचाकीने आपल्या गावाकडे परत जात होता. दरम्यान, चंद्रपूर मार्गावरील महिला
महाविद्यालयाजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर मंगेशला उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेसंदर्भात गडचिरोली पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.
रात्रीच्या सुमारास रस्त्यांवर मोकाट जनावरे राहत असल्याने गडचिरोली शहरात अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते.
गडचिरोली : भरधाव कारने दुचाकीला धडक दिली, यात महिला डॉक्टरसह परिचारिका जखमी झाली. ही घटना २२ ऑगस्टला सकाळी ११ वाजता तालुक्यातील साखरा गावाजवळ घडली.
डॉ. सीमा ढवळे व वैशाली कुळमेथे यांचा जखमींत समावेश आहे. डॉ. ढवळे या साखरा आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर कुळमेथे या परिचारिका आहेत. पोर्ला प्राथमिक आरोग्य केंद्रात बैठकीसाठी त्या दोघी दुचाकीवरून जात होत्य, तर समोरून कार (एमएच ३३ व्ही ३५९३) येत होती. या कारने दुचाकीला जोराची धडक दिली, यात दोघीही जखमी झाल्या. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
गडचिरोली :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व गतीमान करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/signup हे संकेत स्थळ सुरु करण्यात आले असून लाभार्थ्यांनी या संकेतस्थळावर अर्ज भरण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.
या योजनेसाठी 31 जुलैअखेरपर्यंत 1 लाख 52 हजार 327 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 37 हजार 564 अर्ज मंजूर झाले असून 1 लाख 11 हजार 692 अर्ज तपासणीमध्ये आहेत.95 अर्ज नामंजूर झाले असून 3564 अर्ज त्रुटी पुर्ततेसाठी परत पाठविण्यात आले आहेत. अर्ज पडताळणी प्रक्रियेत त्रुटी पुर्ततेसाठी लाभार्थी महिलांना मोबाईवर संदेश पाठविण्यात येत आहे. त्रुटीचा संदेश प्राप्त होताच संबंधीत महिलांनी आवश्यक त्रुटीची पुर्तता करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही संधी एकवेळेसाठीच मिळणार असल्याने त्रुटीची पुर्तता काळजीपुर्वक करावी.
ज्या इच्छुक पात्र लाभार्थीनी अद्याप अर्ज भरले नसल्यास त्यांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in/signup या संकेतस्थळावर क्रियेट अकांउंट वर क्लीक करून आपले अर्ज भरावेत. ज्यांना स्वत: अर्ज भरणे जमणार नाही त्यांनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षीका, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी), ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्र, नगरपालिका/नगरपंचायतीचे मदत केंद्र, अशा वर्कर, बचत गटाचे समुहसाधन व्यक्ती या शासनाच्या अधिकृत प्रतिनिधींकडून /केंद्रावरून अर्ज भरून घ्यावे. ज्या लाभार्थ्यांनी नारिशक्तिदूत या ॲपवर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टल वर अर्ज भरण्याची गरज नाही. अर्ज भरण्याची प्रक्रीया लाभार्थ्यांसाठी मोफत असल्याने त्यासाठी कोणालाही पैसे देवू नये असे जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी प्रकाश भांदककर यांनी कळविले आहे.
000
गडचिरोली दि. 1 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनंतर्गत महास्वयम पोर्टलवर पदे अधिसूचित करणे व उमेदवार नोंदणीची प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी 2 ऑगस्ट रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांनी यावेळी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
महसूल सप्ताह अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सर्व शासकीय कार्यालय, महामंडळ, सहकारी बँका व औद्योगिक आस्थापनांचे प्रमुख, गोंडवाना विद्यापीठ व विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य यांचेसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी या योजने अंतर्गत विविध शासकीय कार्यालयात व औद्योगिक आस्थापनेत रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केले असल्याचे कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.
000
चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याची सीमा असलेल्या वैनगंगा नदीच्या व्याहड बुज च्या मोठ्या पुलावरून नदीपात्रात गडचिरोली जिल्ह्यातील एका युवकाने उडी घेतल्याची माहिती सावली पोलिसांना प्राप्त होताच सावली चे ठाणेदार राजगुरु यांनी स्वतः घटनास्थळी जावून आपली यंत्रणा कामी लावली आहे.
तसेच बोट सुद्धा आणण्यात आलेली आहे. मात्र संततधर सुरु असलेल्या पावसामुळे व्यत्यय येत असून वैनगंगा नदी ही दुधळी भरून वाहत आहे. त्यामुळे पोलिसांना त्यांच्या शोधकार्यात अडथळा येत आहे. तरी नदी काठावर असलेल्या भागातील गावात सावली पोलिसांनी माहिती पोहचविली असल्याचे कळते. बातमी लिहेपर्यंत शोधकार्य जोमात सुरु आहे.
गडचिरोली दि.२३ : शुक्रवारपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सिरोंचा विभागात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची जिल्हाधिकारी संजय दैने व जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल यांनी आज हेलिकॉप्टरमधून पाहणी केली. त्यांनी गोदावरी व प्राणहिता नदी व त्यावरील धर्मपूरी पूलाची पाहणी केली.
जिल्हाधिकारी दैने यांनी पुरपरिस्थिती ओसरल्यानंतर करावयाच्या उपाययोजनासंबंधी तहसिल कार्यालय, सिरोंचा येथे तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतला. साथरोग पसरू नये याची काळजी घेणे, पिण्याच्या पाण्याचे स्रोत विहित पद्धतीने स्वच्छ करणे, डास प्रतिबंधक फवारणी करणे, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पूर पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गर्दी करण्यापासून परावृत्त करणे, नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांना गरजेनुसार शेल्टर होम मध्ये स्थलांतरित करण्यासाठी तत्पर राहणे, वीजा चमकत असतांना झाडाखाली आश्रय न घेण्याबाबत जनजागृती करणे आदी बाबींवर जिल्हाधिकारी यांनी यंत्रणेला सूचना दिल्या.
याप्रसंगी जिल्हा आपत्ती सल्लागार कृष्णा रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक, गटविकास अधिकारी अनिलकुमार पटले, तहसीलदार श्री तोटावार तसेच तालुकास्तरीय यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटनेचे सल्लागार मा.भिमराज पात्रिकर यांनी उपस्थितांना गुणवंत ज्ञानवंत सत्यशोधक होवुन सर्व समस्याचे निराकरण स्वता करण्यास तयार रहावे. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन लाभलेले मा.धर्मानंद मेश्राम, सेनि शिक्षण विस्तार अधिकारी यांनी 12वी नंतर प्रवेश घेता येणा-या सर्व फॅकल्टीजची माहिती दिली व यवतमाळ येथील सत्यशोधक विज्ञापीठात जीवन बदलविणा-या प्रशिक्षणात भाग घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर खालील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
॰
*विविध शासकीय विभागात नौकरीवर निवड
वैभव गुरनुले, भाग्यश्री मदनकर, मंगेश मोहुर्ले, सुरज मोहुर्ले, सागर गावतुरे, भाग्यश्री भेंडारे
॰
12वी गुणवंत
87.40 आदित्य मोहुर्ले, 80.83 सानिका गुरनुले, 78.50 मंगेश भेंडारे, 78.16 गायत्री गुरनुले, 77 योगेंद्र कावळे व भुषण कोकोडे, 76 थामदेव निकुरे
10वी गुणवंत
93.20 आस्था वाडगुरे, 91.80 हिमांगी गुरनुले, 89.20 मानशी सोनुले व सुजय मोहुर्ले व तेजस गावतुरे, 88.20 जान्हवी मांदाडे, 87.60 सायली मोहुर्ले व वैभवी सोनुले, 88.60 हर्षाली मांदाडे, 85.40 तनुश्री जेंगटे, 84.80 चंदना निकोडे, 84 जिज्ञासा जेंगठे, 83.60 चैतन्या कोटरंगे, 83.40 सोनी आदे, 83.00 जान्हवी रस्से व गौरव मोहुर्ले, 82.80 किशोर ढोले, 82.40 कुमुदिनी मोहुर्ले, 81.20 आस्था लेनगुरे, 80.20 धिरज पेटकुले, 81.60 प्रतिक जेंगठे
कार्यक्रमाचे अध्यक्ष फुलचंद गुरनुले, ग.जि.मा.स.सं.चे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे संजय लेनगुरे, गुरुदास बोरुले, पुरण पेटकुले होते. प्रस्तावना अशोक मांदाडे संचालन गिरीष लेनगुरे व आभार उमेश जेंगठे यांनी मानले. यशस्वीतेसाठी रमेश जेंगठे, योगेश सोनुले, नरेंद्र निकोडे, किसन सोनुले, संतोष मोहुर्ले, शंकर चौधरी, लक्ष्मण मोहुर्ले,भाष्कर गुरनुले, इतर सर्वांनी मदत केली. कार्यक्रमास विद्यार्थी-पालक व समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
एक जखमी : कारगिल चौकातील घटना
गडचिरोली : नादुरुस्त ट्रॅक्टर-ट्रॉलीपिकअपला बांधून नेत असताना पिकअप वाहनाने येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने एक महिला ठार, तर एक युवक गंभरी जखमी झाल्याची घटना २ मे रोजी गुरुवारी सायंकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास शहरातील मुल मार्गावर कारगिल चौकात घडली. विशेष आपल्या लहान मुलाचे लग्न आटोपून सावलीकडे परत जाताना नवरदेवाच्या आईचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
रेखा नामदेव राऊत (वय ४४) रा. सावली, जि. चंद्रपूर असे मृत महिलेचे नाव आहे, तर दुचाकीस्वार बंडू भलवे (२७) रा. सावली हा जखमी झाला. अपघात घडल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत दोनही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, रक्तबंबाळ झालेल्या रेखा राऊत या महिलेचा मृत्यू झाला,तर जखमी बंडू भलवे यांच्यावर उपचार सुरू आहेत.सावली येथील नामदेव राऊत यांच्या दोन मुलांचे लग्न होते. अमित राऊत नामक मोठ्या मुलाचे लग्न १ मे बुधवारी सावली येथे पार पडले, तर २ मे रोजी लहान मुलगा अविनाश राऊत याचे लग्न रांगीनजीकच्या निमगाव येथे होते. हे लग्नकार्य आटोपून नवरदेवाची आई रेखा राऊत ही दुचाकीवरून गडचिरोलीमार्गे सावलीकडे जात होती. दरम्यान, कारगिल चौकात पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिली.
अपघाताची पुनरावृत्ती.... विशेष म्हणजे मागील वर्षी १ मे
२०२३ रोजी याच कारगिल चौकात एका युवकाला ट्रकने जागीच चिरडले होते. एक वर्षानंतर परत याच ठिकाणी याच तारखेला अपघात झाला. शहरातील वाढत्या अतिक्रमणाकडे प्रशासनाचा दुर्लक्षितपणा जीवघेणा ठरत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यासाठी 85 कोटी मंजूर; ई - पीक नोंदणी आवश्यक
गडचिरोली, ब्युरो. दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना 85 कोटी 35 लाख 47 हजार 780 रुपये एवढी बोनसची रक्कम खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
खरीप पणन हंगाम 2023-24 मधील धान खरेदीसाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर करण्याबाबत राशीची रक्कम शासनाने 26अदा मार्चला परिपत्रक काढले आहे.
त्यानुसार नोंदणीकृत शेतकऱ्यांनी महामंडळाला धान विक्री केली असो वा नसो धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धोरणानुसार प्रतिहेक्टरी रुपये 20 हजार प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत राहून प्रोत्साहन राशी बोनस अदा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. 31 मार्च पर्यंत सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील धान
उत्पादक दहा जिल्ह्यांना हा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश आहे. सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी ई-पीक वर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच आदिवासी खरेदी संस्था किंवा महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्यामार्फत चालवण्या जाणाऱ्या खरेदी संस्थांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
गडचिरोली गडचिरोली- चिमूर लोकसभा निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. काही जण मुंबईत, काही दिल्लीत तळ ठोकून आहेत. बुधवारी रात्री उशीरा काँग्रेसकडून डॉ. नामदेव किरसान यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी २० मार्च रोजी अधिसूचना जारी झाली व लगेचच नामनिर्देशनपत्र विक्री व स्वीकृतीलाही सुरुवात केली. पहिल्या दिवशी एकही नामदनिर्देशनपत्र दाखल झाले नाही. चौघांनी एकूण १४ नामनिर्देशनपत्रांची खरेदी केली, पण अर्ज दाखल करण्यास कोणीही पुढे आले नाही.
मतदारसंघातील उमेदवारीवरून निर्माण झालेला पेच कायम आहे. महायुतीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात रस्सीखेच आहे, तर महाविकास आघाडीत मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला असून नामदेव उसेंडी व नामदेव किरसान यांच्यामध्ये चुरस होती. पक्षश्रेष्ठींनी किरसान यांच्या नावाला हिरवी झेंडी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.
काँग्रेसचे सर्व इच्छुक व प्रमुख पदाधिकारी हे दोन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत. अधिकृत घोषणा गुरूवारी अपेक्षीत आहे.
नेते, धर्मरावबाबांकडून दबावतंत्राचा वापर
१९ मार्च रोजी गडचिरोलीत खासदार अशोक नेते यांच्या समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपलाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी लावून धरली होती. यावेळी राष्ट्रवादीला उमेदवारी देण्यास तीव्र विरोध दर्शवला होता. त्यानंतर सायंकाळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत दावेदारी प्रबळ केली. त्यामुळे महायुतीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू झाला आहे.
निवडणूक खर्च निरीक्षकांकडून आढावा
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात २० मार्च रोजी निवडणूक खर्च निरीक्षक एस. वेणुगोपाल यांनी विविध ठिकाणी भेटी देत कार्यालयीन कामकाजाची पाहणी केली तसेच सहायक निवडणूक अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. आरमोरी, गडचिरोली, चिमूर व ब्रह्मपुरी या विधानसभा मतदार संघांना एस. वेणुगोपाल यांनी भेट दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, सहायक जिल्हाधिकारी राहुल मीना, ओमकार पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके उपस्थित होते. सर्वसामान्य मतदार, निवडणूक लढणारे उमेदवार, राजकीय पक्ष यांनी निवडणूक खर्चविषयक तक्रारी एस. वेणुगोपाल यांच्याकडे किंवा निवडणूक विभागाच्या सी-व्हिजील या मोबाइल अॅपवर नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.
२६ दिवसानंतर आरोपीस केली होती अटक
देसाईगंज - तालुक्यातील कुरूड येथील प्रदीप ऊर्फ पंड्या विजय घोडेस्वार (३०) याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी विकास जनार्दन बोरकर (५०) रा. कुरुड याला न्यायालयाने ११ मार्च पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. विशेष म्हणजे घटनेच्या २६ दिवसानंतर देसाईगंज पोलिसांनी आरोपीस नाट्यमयरित्या अटक केली होती.
यात्रेतील भांडणातून तसेच पूर्ववैमनस्यातून त्याने डोक्यात कवेलू मारून तरुणास संपविल्याचे समोर आले आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय गोंगले यांच्या फिर्यादीनुसार, ८ फेब्रुवारीला रात्री
कुरुड येथे यात्रोत्सवानिमित्त नाटक आले होते. नाटक पाहण्यासाठी गेलेल्या प्रदीप घोडेस्वार याचा मृतदेह स्वतःच्या थारोळ्यात घरासमोर आढळला रक्ताच्या होता. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
वैद्यकीय अहवालानंतर २८ फेब्रुवारीला उपनिरीक्षक संजय गोंगले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, प्रतीकचा खून झाला तेव्हा अंधार होता, शिवाय सीसीटीव्ही नव्हते, यात्रेमुळे गावात गर्दी होती. त्यामुळे मारेकरी शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. अखेर प्रदीपबद्दल पोलिसांनी सखोल
माहिती जाणून घेतली असता त्याचे विकास बोरकरशी नेहमी भांडण होत असे, हा क्ल्यू मिळाला. त्याआधारे पोलिसांनी विकासकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, खाक्या दाखविताच तो वठणीवर आला.
त्याने खुनाची कबुली दिली. दरम्यान, पो. नि. अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर यांनी ६ मार्चला विकास बोरकरला अटक केली. त्याला न्यायालयायापुढे उभे केले असता ११ मार्च पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
(T.P.)
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली _ विदर्भातील प्रसिद्ध कवी व गझलकार प्रा.डॉ. नोमेश नारायण मेश्राम यांच्या राजहंस प्रकाशन पुणे या महाराष्ट्रातील मातब्बर प्रकाशन संस्थेतर्फे जुलै २०२३ मध्ये प्रकाशित 'रक्तफुलांचे ताटवे' या कवितासंग्रहाला महाराष्ट्रातील विविध साहित्य संस्थांकडून आजपावेतो उत्कृष्ट साहित्यकृती अंतर्गत १२ राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
ब्रम्हपुरी येथे वास्तव्यास असलेले प्रा.डॉ. नोमेश नारायण मेश्राम हे आरमोरीच्या महात्मा गांधी महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख आहेत. त्यांच्या 'रक्तफुलांचे ताटवे' या कवितासंग्रहाला शेगाव येथील स्व.बाबुराव पेटकर काव्य सन्मान,नागपूर येथील साहित्यविहार संस्थेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार,मुक्ताईनगर जळगाव येथील उज्जैनकर फाउंडेशनचा तापी पूर्णा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार,आर्वी येथील देवकाई राज्यस्तरीय काव्य पुरस्कार, शिवांजली साहित्यपीठ जुन्नर, अॅग्रोन्यूज साहित्य संस्था फलटण,साहित्य प्रज्ञा मंच पुणे, कृतिशील शिक्षक संघटना ठाणे राज्यस्तरीय उत्कृष्ट कवितासंग्रह, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ मुंबई,सूर्योदय साहित्य पुरस्कार जळगाव, डॉ.शिवाजीराव चव्हाण ग्रंथमित्र राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार हे महाराष्ट्रातील विविध भागातील प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
त्याबद्दल त्यांचे राजहंस प्रकाशन पुणे,मित्रपरिवार व अनेक साहित्यिकांनी अभिनंदन केले आहे.
येणापूर,आंबोली येथील कायदा दणक्याचा या न्युज पोर्टलचे सं पादक संतोष मेश्राम. यांच्या घरावर तीन गावागुंडानी प्राणघातक हला करून,त्यांच्या बहिणीला,व आईला मारझोड करून त्यांच्या घराची मोडतोड सुधा केलेली आहे.
तसेच त्यांच्या सम्पूर्ण कुटूंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तीन गावागुंडाणा आष्टी पोलिसांनी लगेच ताब्यात घेतलेलेअसून. त्यांच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हेगारांनावर भा. द. वी. 294.323.506.34 अन्वये गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाही सुधा केलेली आहे.
हे तिनही गावगुंड चामोर्शी तालुक्यातील बल्लूचक येथील असल्याचे सांगितले जात आहे
सदर घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस स्टेशनचे ठाणेदार काळे करीत आहेत.
गडचिरोली : पूर्वीच्या काळी १९ ते २२ व्या वर्षी मुला-मुलींची सर्रास लग्न व्हायची. परंतु आता मात्र लग्नाचे वय ३० ते ३८ च्या घरात जाऊन पोहचले आहे. लग्नासाठी मुली मिळत नसल्याने तरुणांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. मुलीच्या कुटुंबियांना आपल्या मुलींसाठी सरकारी नोकरी किंवा शहरात चांगल्या कंपनीत नोकरीवर असलेलाच जावई पाहिजे असल्याची मानसिकता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस लग्नाची समस्या जटील होत चालली असून, गावा-गावांत विवाह इच्छुक मुलांची संख्या वाढत आहे.
मागील काही दशकात ग्रामीण समाजव्यवस्था झपाट्याने बदलली. आधुनिकीकरण, तंत्रज्ञान आणि पाश्चिमात्य संस्कृती, सुख-सोई ह्या गोष्टींची महिती वाढली आहे. परिणामी लोकांच्या मानसिकतेतही बदल दिसू लागले. मुलगी जरी कमी शिकलेली असली तरीही मुलीच्या कुटुंबियांना आपल्या मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारी नोकरी किंवा शहरात गलेलठ्ठ नोकरी असलेला जावई हवा असल्याची मानसिकता वाढली आहे. काही काही कुटुंबातील तरुण दहा ते पंधरा हजार रुपयांसाठी कंपनीमध्ये जातात परंतु त्याच घरच्या मुलींना जावई मात्र पाहिजे साठ हजाराचा असे विचारसरणी सगळीकडे झाली आहे .जणू काही व्यापारी, सर्वसामान्य मुलगा संसार करू शकत नाही असा भ्रम तरुणींच्या आई-वडिलांना झाल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे.
मुलीचे लग्नाचे वय निघून गेल्यानंतर त्यांच्याकडे समाजामध्ये वेगळ्या दृष्टिकोन बघायला मिळते आणि मग मुली एखाद्या तरुणाला घेऊन पळून जातात त्यामुळे अशा लग्न विषयाकडे मुलींनी कुठलाही हट्ट , संस्कारी चांगली वर्तणूक असणाऱ्या कष्टाळू तरूणासोबत लग्न करण्यासोबत काही हरकत नाही
झपाट्याने काळ बदलला आणि समाजात चौकसपणा वाढला, अनेकांच्या आयुष्यात सुख, सोई-सुविधा आल्या. शिक्षणाचे प्रमाण वाढले. मोबाईलच्या युगात सोशल मीडियामुळे बरेच बदल झाले. करिअरचा विचार करून उत्पन्नाचा प्रश्न आणि भविष्याचा विचार महत्वाचा वाटू लागला. या सर्व चक्रव्युहात विवाहयोग्य मुला-मुलींचे वय मात्र वाढत चालले आहे. तरुणाईचे रूपांतर प्रौढात होत असून विवाहाचे वय आणि शारीरिक अवस्था देखील निघून जात असल्याची विदारक स्थिती सर्वत्र दिसून येत आहे. समाजातील या गंभीर समस्येला नेमकं जबाबदार कोण? हाच खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
प्रत्येक गावात विवाह इच्छुक मुलांची संख्या वाढतेय!
ग्रामीण भागात सध्या विवाहाची समस्या वडीलधाऱ्या मंडळींसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. मुलाचे विवाहाचे वय होऊनही कुणी मुलगी दाखवण्यास तयार नसल्यामुळे मुले सुद्धा निराशेच्या गर्तेत जात आहेत. परिणामी, प्रत्येक गावात किमान ४० ते ५० च्यावर विवाहयोग्य तरुण असल्याचे दिसून येत आहे.
कित्येक मुले तीस-पस्तीस असताना सुद्धा कुठलाही व्यसन न करता आपले कामे करत आहेत परंतु शासकीय कर्मचारी कशा प्रकारचा असला तरी योग्य वर्तणूक नाही ,शंशाही, दारुडा अशा शासकीय कर्मचाऱ्याला मुली दिल्या जातात म्हणजे सर्व मुलीच्या आई वडिलांना असं वाटते की आपली मुलगी शासकीय कर्मचाऱ्याला जावई करून आपला सर्वांनी विकास करावा.
ज्या तरुण पोरींचे आई-वडील कष्ट करून आपला घर संसार चालवीत असतात अशा तरुनींचे सुद्धा मोठ्या प्रमाणात भाव वाढले आहेत .त्यामुळे कधी कधी त्यांच्या कुटुंबामध्ये भांडण सुद्धा होत असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु संसार करण्यामध्ये सामंजसपणामध्ये कुठली भूमिका घेतल्यास संसार योग्य दिशेने उत्तम दिशादर्शक ठरू शकते ज्याचा भान ठेवून तरुण-तरुणीने चिंतन मनन करून आपला जोडीदार निवडावा हीच अपेक्षा आहे.
गडचिरोली- आज देशाचे संविधान,लोकशाही व धर्म निरपेक्ष स्वरूप धोक्यात आले असून ते वाचविणे अत्यंत आवश्यक आहे. अशावेळी येणाऱ्या निवडणुकी मध्ये पुरोगामी व समविचारी लोकांसोबत सर्वांनी ताकतीने उभे राहावे असे आवाहन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केले आहे.
पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांचे प्रमुख उपस्थितीत चांदेकर भवन येथे आज संपन्न झाली त्यावेळी हे आवाहन करण्यात आले.
रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत प्रदेश सचीव प्रा. राजन बोरकर, केशवराव सामृतवर, गडचिरोली विधान सभा प्रमुख प्रदीप भैसारे, आरमोरी विधान सभा प्रमुख कृष्णा चौधरी, महिला आघाडीच्या नेत्या सुरेखाताई बारसागडे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, युवक जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, महिला सरचिटणीस ज्योती उंदीरवाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
या सभेत देशातील सध्याची परिस्थिती आणि जिल्यातील समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आज देशातील दलित, आदिवासी, मागासवर्गीय तथा अल्पसंखांक लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. बेरोजगारी, महागाई सोबतच शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न जटील झाले आहेत परंतु सरकारचे त्याकडे दुर्लक्ष आहे. गडचिरोली जिल्यातील मौल्यवान वन व खनिज संपत्ती लुटल्या जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगाच्या नावावर बळकावल्या जात आहेत याकडे सभेत लक्ष वेधण्यात आले आणि या सर्व प्रश्नांवर व्यापक जनलढा उभारण्याचे ठरविण्यात आले. निवडणूक पारदर्शी व निष्पक्ष पद्धतीने लढविण्यासाठी ईव्हीएम त्वरित बंद करण्यात याव्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
संविधान आणि लोकशाहीचे संरक्षण हि आजची सर्वात मोठी प्राथमिकता आहे. त्यासाठी आज देशभर मोठे आंदोलन सुरु असून याकामी पुढाकार घेणाऱ्या सर्व संगठना व नेत्यांना बैठकीत पूर्ण समर्थन जाहीर करण्यात आले.
या सभेला साईनाथ गोडबोले,दादाजी धाकडे, अरुण भैसारे, हेमाजीं सहारे, कविता वैद्य यांचेसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित महाअभिषेक व भजनस्पर्धेसाठी - अभिनेत्री सोनाली कुलकर्णी येणार आहे.
वैरागड येथे भोलू सोमनानी व मित्रपरिवाराच्या पुढाकाराने महाशिवरात्री महोत्सव होत आहे. भजन स्पर्धेत पाच विजेत्यांना दोन हजारांपासून ते दहा हजारांपर्यंत आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. सकाळी ९ वाजता भंडारेश्वर मंदिरात महाअभिषेक केला जाणार आहे. दुपारी हवन, सायंकाळी गोपाळकाला व सायंकाळी सहा वाजेनंतर भोजनदान करण्यात येईल
सिरोंचा : पंतप्रधानांच्या यवतमाळ येथे होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त अहेरीआगारातून तब्बल १० बसेस पाठविण्यात आल्याने अहेरी आगारात बसेसेचा तुटवडा निर्माण झाला. सिरोंचासाठी तब्बल पाच तासांनी बस सोडण्यात आली. त्यामुळे बसमध्ये गर्दी एवढी झाली की, बसच्या मागच्या बाजुला गेलेल्या बस वाहकाला त्याच्या सीटकडे येण्यासाठी जागाच उरली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सीटवर पाय ठेवत वाहकाने आपली सीट गाठली, त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अहेरी ते सिरोंचा १०७ किलोमीटरच्या या मार्गावर मागील काही वर्षांपासून जीवघेणा प्रवास सुरू आहे. रस्त्यावरील खड्डे अन् एसटी महामंडळात असलेल्या बसची कमतरता यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मंगळवारी ८:०० वाजेपासून सिरोंचासाठी एकही बस नसल्याने या मार्गावरील प्रवाशांना पाच तास ताटकळत राहावे लागले. अखेर दुपारी १:०० वाजताच्या सुमारास अहेरी आगारातून सिरोंचासाठी आलापल्ली येथे बस लागली. मात्र, ती बस अगोदरच फुल्ल भरून आल्याने येथील प्रवाशांना नाइलाजास्तव भरगच्च भरलेल्या बसमधून उभ्यानेच प्रवास करावा लागला. बस अगोदरच भरली होती. त्यातच नवीन प्रवाशांना बसवणे आवश्यक होते. उभे असलेले प्रवाशी बसच्या मागच्या बाजूस सरकत नसल्याने नवीन प्रवाशांना जागा होत नव्हती. त्यामुळे वाहकाने प्रवाशांना मागे सरकवले. त्यानंतर वाहकाला आपल्या सीटवर येण्यास जागाच राहिली नाही. परिणामी त्याने प्रवाशांच्या सीटवर पाय ठेवत आपली सीट गाठली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गडचिरोली : राजाराम येथील धान खरेदी केंद्रावर मापात पाप केले जात असल्याचा दावा करुन १२ फेब्रुवारीला मन्नेराजाराम पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. या प्रकरणात खरेदी केंद्रावर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली.
पोलिसांत केलेल्या तक्रारीत ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे की, शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आणि मार्केटिंग फेडरेशन मार्फत शेतकऱ्याकडून धान खरेदी करण्यात येते. सध्या आदिवासी विकास महामंडळाचे ९३ आणि मार्केटिंग फेडरेशनचे २१ असे
साधारणतः ११४ खरेदी केंद्रांवर ही धान खरेदी सुरु असून आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांची मुस्कटदाबी केली जात येत आहे. शासन नियमा प्रमाणे खरेतर एका गोणी (पोते) मध्ये ४० किलो ६०० ग्रॅम वजनापेक्षा अधिक धानाची खरेदी करता येत नाही. मात्र जिल्हाभरातील सर्व धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून ४२ ते ४३ किलो प्रती गोणी (पोते) वजनाने शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
राजाराम येथील खरेदी केंद्रावरही हा प्रकार होत असून गुन्हा नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली. सरपंच शारदा कोरेत, पोलिस पाटील इंदरशाह मडावी, कृष्णा सेडम उपस्थित होते.
दारूबंदीवर जनमत चाचणीसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार
गडचिरोली : आदिवासीबहुल व मागास गडचिरोलीतील दारूबंदीबाबत पुनर्विचार करावा व बनावट दारूमुळे जात असलेले बळी रोखावेत. त्याकरिता जनमत चाचणी घ्यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करून न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र आदिवासी व मागासवर्गीय कृती समितीचे समन्वयक डॉ. प्रमोद साळवे यांनी १० फेब्रुवारीला येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
जिल्ह्यातील दारूबंदीचे विदारक चित्र सर्वांसमोर आहे. असे असताना केवळ काही लोकांच्या हट्टापायी बंदी कशासाठी असा सवाल त्यांनी केला आहे. दारूबंदीमुळे मोहफुलांची कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे. अनेक युवक तस्करीच्या धंद्यात अडकले असून यातून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्थ होत आहे. काही जणांना बनावट दारूमुळे जीव गमवावा लागलेला आहे.
बंदी असतानाही चढ्य दराने खुलेआम दारूविक्री होत असेल तर ही आदिवासींची लूट नाही का, असा प्रश्न डॉ. साळवे यांनी केला. यासंदर्भात तातडीने जनमत चाचणी घ्यावी म्हणजे सामान्यांच्या भावना लक्षात येतील, असे त्यांनी सांगितले. यांसदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराजे देसाई, राज्यपाल, प्रधान सचिव व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवले आहे. अॅड. संजय गुरू, संतोष ताटीकोंडावार, अनिल मेश्राम, भूषण सहारे, स्वप्निल पवार, रोशनी पवार, अन्वर हुसेन उपस्थित होते.
तक्रार निवारण प्रणाली' पोर्टल : २१ दिवसांत तक्रारींचे निवारण करणे अनिवार्य
गडचिरोली: नागरिक विविध कामानिमित्त शासकीय कार्यालयांमध्ये जातात, परंतु, त्यांचे काम वेळीच होत नाही. अनेकदा अधिकारी किंवा कर्मचारी कामे अडवून ठेवतात. अशावेळी काय करावे, असा प्रश्न संबंधित नागरिकाला पडतो. परंतु, यावर आता पर्याय उपलब्ध झाला आहे. काम अडलेल्या विभागाविरोधात 'तक्रार निवारण प्रणाली' या पोर्टलवर तक्रार नोंदवता येते.
शासकीय विभागातील कार्यप्रणाली ऑनलाइन झाल्याने नागरिकांना विविध सेवा ऑनलाइन स्वरुपातच प्राप्त कराव्या लागतात. ऑनलाइन अर्ज सादर करून दाखले, प्रमाणपत्र प्राप्त करावे लागते. गेल्या वर्षभरात पंचायत समित्यांमधील कामांबाबत सर्वाधिक तक्रारी या पोर्टलवर आल्या.
* काम वेळेत होत नसल्यास करा पोर्टलवर तक्रार
शासकीय कार्यालयात नागरिकाचे काम अडले असल्यास त्यांना तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलवर तक्रार सादर करता येते. तक्रारीच्या माध्यमातून त्याला आपले म्हणणे मांडता येते.
कामासाठी अर्ज केव्हा केला, किती अवधीत काम होणे आवश्यक होते. यासह विविध बाबींचा अंतर्भाव करावा लागतो. संबंधित विभागाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर तक्रारीविषयी पडताळणी केली जाते.
*तांत्रिक अडचण आल्यास हेल्पलाईन
तक्रार निवारण प्रणाली पोर्टलवर तांत्रिक अडचण आल्यास किंवा या प्रणालीबाबत अधिकची माहिती हवी असल्यास कॉल सेंटर प्रतिनिधींशी केव्हाही संपर्क साधून आपली अडचण सांगता येते. यासाठी१८००१२०८०४० हा टोल फ्री क्रमांक तक्रार निवारण प्रणालीवर शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकाचा वापर नागरिक अडचणीच्या काळात करू शकतात
*किती तक्रारींचे झाले निराकरण
विविध विभागात कामे अडल्याबाबत जिल्ह्यात २००वर तक्रारी पोर्टलवर प्राप्त झाल्या, यापैकी १००हून अधिक तक्रारींचे निराकरण करण्यात आले. त्यामुळे नागरिकांचे शासकीय कार्यालयातील हेलपाटे थांबण्यास मदत झाली.
*वर्षभरात २००वर तक्रारी
जिल्ह्यातील नागरिकांकडून विविध विभागातील काम अडल्याबाबत जवळपास २००वर तक्रारी पोर्टलवर प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींचे निवारण संबंधित विभागाकडून करण्याची कार्यवाही काही प्रमाणात करण्यात आली.
*महसूल विभागाबाबतही अनेकजणांच्या तक्रारी
महसूल विभागामार्फत नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्र तसेच शेतीविषयक दाखले व प्रमाणपत्र वितरित केली जातात. सदर प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी नागरिकांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. याबाबत अनेकांनी ऑनलाइन तक्रारी करून लक्ष वेधले.
*सर्वच तक्रारींचे निवारण होते का?
तक्रार निवारण प्रणाली पोर्टलवर तक्रार सादर केल्यानंतर सर्वच तक्रारींचे निवारण केले जात नाही. ५० ते ६० टक्केच तक्रारींचे निवारण होते. अनेकदा संबंधित विभागातील अधिकारीसुद्धा दुर्लक्ष करतात, तर काही लाभार्थीसुद्धा त्रास वाढल्याचे कारण दाखवून माघार घेत असल्याची प्रकरणे आहेत.