नायलॉन मांजामुळे २४ वर्षीय तरुणाचा गळा कापला
भंडारा:-नायलॉन माजांवर बंदी घालण्यात आली असली तरी देखील अनेक ठिकाणी सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे. मात्र, हाच नायलॉन मांजा अनेकांसाठी धोकादायक ठरत आहे. लाखनी येथील उड्डाणपुलावर भंडाराकडून गोंदियाच्या दिशेने जात असलेल्या एका २४ वर्षीय तरुणाचा नायलॉन मांजाने गळा कापला. ही धक्कादायक घटना १३ जानेवारीरोजी सायंकाळच्या सुमारास घडली. शुभम जियालाल चौधरी रा. गोरेगाव, जि. गोंदिया असे जखमी तरुणाचे नाव आहे.
शुभम हा मकरसंक्राती निमित्ताने दुचाकीने भंडाराकडून गोंदियाच्या दिशेने जात होता. दरम्यान, लाखनी शहरात नायलॉन मांजाचा वापर सर्रास सुरू असल्यामुळे कटलेला पतंगीचा मांजा गळ्यात अडकल्याने गळा कापला गेला. यात शुभम गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला भंडाराच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरवर्षी मकरसंक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणात पतंग उत्सवाचे आयोजन केले जाते. यात नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. बंदी असतानाही मांजाची विक्री होत आहे. यात पशुपक्षी तर जखमी होत आहेत. मात्र, आता याचा सर्वाधिक दुष्परिणाम मानवावरही दिसून येत आहे. याच नायलॉन मांजामुळे २४ वर्षीय शुभमचा गळा कापला गेला. सुदैवाने तो बचावला.
नायलॉन मांजा बंदीबाबत प्रशासनाने गंभीर पावले उचलावीत, त्याचबरोबर विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली.
गडचिरोली दि. 14 : गडचिरोली जिल्ह्यात विकासकामांसाठी प्रचंड वाव असून, विविध विभागांनी आपसी समन्वय साधून जिल्हा नियोजन विकास निधीचा योग्य वापर करून कामे मार्गी लावावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले. त्यांनी जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत प्रकल्पांसाठी योग्य नियोजन आणि निधीचा प्रभावी उपयोग करण्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विविध विभागांना जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर झालेल्या निधीच्या खर्चाचा आढावा मॅराथॉन बैठकीतून घेतला. त्यांनी विभाग प्रमुखांना दायित्व रक्कमेची अगोदर मागणी करून नंतर नवीन कामांची नोंदणी आयपास प्रणालीवर प्राधाण्याने करण्याचे आणि प्राप्त निधी तातडीने खर्च करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नियोजन विभागानेही प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांचा निधी प्राप्त निधीच्या प्रमाणात संबंधीत विभागांना तातडीने बीडीएस प्रणालीवर वितरीत करण्याचे सांगितले.
येत्या काळात जिल्ह्यातील खाणकाम रोजगार मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने कौशल्य विकास विभागाने खाणकामाशी संबंधित प्रशिक्षण सुरू करावे, सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील पर्यटन स्थळे आणि गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष नियोजन करावे, जिल्हा ग्रंथालयाने सुसज्ज आणि आधुनिक ग्रंथालय निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सुचवले. विकासनिधी मंजूर असलेल्या सर्व कार्यालयांनी निधी खर्चासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरी तातडीने मिळवावी, असे स्पष्ट निर्देश यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले. यासंदर्भात निधी उपलब्धता, प्रशसकीय मान्यता अथवा इतर कोणत्याही अडचणी असल्यास संबंधीत विभागाने आपल्याशी प्रत्यक्ष संपर्क करण्याच्या सूचनाही त्यांनी यसाप्रसंगी दिल्या.
बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
000
कुरखेडा : दुर्गम गावातून उच्च शिक्षण घेण्यासह पोलिस भरतीची तयारी करण्याकरिता गडचिरोली गाठले. दोघेही वेगवेगळ्या गावचे; पण ध्येय एकच होते. जवळपास भाड्याच्या खोलीत राहत असल्याने ओळख झाली. सततच्या संपर्कामुळे आपुलकी व जिव्हाळा निर्माण झाला. दोघेही प्रेमात आकंठ बुडाले. एकमेकांशिवाय जगणे अशक्य वाटू लागले. अंगावर खाकी वर्दी चढवू पाहणारे हे प्रेमीयुगुल अखेर ११ जानेवारी रोजी गेवर्धा येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने बोहोल्यावर चढून विवाहबद्ध झाले.
अनिल सुधाकर पोर्तेट (24) एम.पो. जिमलगट्टा ता.अहेरी व अनिता सुक्रम कोरामी (२६) मु, कसुरवाहीपो. जारावंडी ता. एटापल्ली अशी विवाहबद्ध झालेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. अनिल व अनिता हे गडचिरोली येथे उच्च शिक्षण घेण्यासह पोलिस भरतीची तयारी करण्याकरिता गडचिरोली येथे आले होते. गडचिरोली शहरातील एका वॉर्डात ते परिसरातच राहून अभ्यास करीत असत. सोबतच पोलिस भरतीची तयारी करीत होते. यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख झाली. या ओळखीचे मैत्रीत, त्यानंतर प्रेमात रुपांतर झाले. दोघांचेही एकमेकांवर प्रेम एवढे दृढ झाले की, त्यांनी प्रेमविवाह करण्याचे ठरविले; परंतु आपल्या प्रेमाला कुटुंबीयांकडून विरोध होऊ शकतो, अशी शंका त्यांच्या मनात होती. अखेर गेवर्धा येथे तंमुसच्या पुढाकाराने विवाह सोहळा पार पाडण्यात आला. याप्रसंगी सरपंच सुषमा मडावी, तंटामुक्त गाव समिती
मित्र बनला दुवा
गडचिरोलीतसुद्धा कोणीच ओळखीचे नव्हते. तेव्हा त्यांच्या परिसरातच राहून शिक्षण घेणारे गेवर्धा येथील मित्र लोमेश्वर कुळमेथे यांच्यासमोर त्यांनी प्रेमविवाहाची इच्छा बोलून दाखविली. कुळमेथे यांनीही यातून मार्ग शोधत गेवर्धा येथे तंमुसच्या पुढाकारातून प्रेमविवाह करण्याचा सल्ला दिला व त्यांना गेवर्धा येथे विवाह झाला.
अध्यक्ष राजू बारई, पोलिस पाटील भाग्यरेखा वझाडे, ग्रा.पं. सदस्य रोशन सय्यद, आशिष टेंभुर्णे, राजेंद्र कुमरे, सुरेश पुसाम, सुधीर बाळबुद्धे, मडावी, योगेश नखाते, प्रभाकर कुळमेथे, संदीप कुमरे, माधुरी शेंडे, हीना पठाण, मनीषा कुळमेथे, डाकराम कुमरे, कृष्णा मस्के, दिनेश कावळे, पीयूष कुळमेथे, राहुल नखाते, विनोद गावळे व नागरिक उपस्थित होते.
दिड महिण्यापुर्वीच्या दुखःतून सावरण्याअगोदरच दुसरा आघात
माजी उपसरपंच पुण्यमुर्तीवार यांचे अपघातात उपचारा दरम्यान मृत्यू
एटापल्ली; (गडचिरोली)
येथील माजी उपसरपंच पापा उर्फ अभय वसंतराव पुण्यमुर्तीवार (वय ४५) यांचे स्वतःच्या दुचाकीवरून कोसळून झालेल्या अपघाताने चंद्रपुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान दुःखद निधन झाले.
पापा उर्फ अभय पुण्यमुर्तीवार हे (ता. १० जानेवारी) शुक्रवारी एटापल्ली वरून तोडसा गावाकडे जातांना दोन किमी अंतरावरील एकरा फाट्याजवळ त्यांचे स्वतःच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात होऊन ते खाली कोसळले होते सदरची माहिती त्यांनी स्वतः नातेवाईकांना फोन करून अपघाताची सांगितली होती. माहितीवरून नातेवाईकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते, अपघातात त्यांच्या छातीच्या खालच्या बरगळीला जबर गुप्त मार लागल्यामुळे अधिक उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात पुढील उपचारार्थ हलविण्यात आले होते, यावेळी त्यांना झालेले दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली, गेली तीन दिवसांपासून उपचार सुरू असतानाच (ता. १३) सोमवारी पहाटे तीन वाजताचे दरम्यान पुण्यमूर्तीवार यांची प्राणजोत मालविली, त्यांच्या अकाली व दुःखद निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला असून सामाजिक कार्यात अग्रेसर व मनमिळावू स्वभावाचे पापा पुण्यमूर्तीवार यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पापा पुण्यमूर्तीवार यांचे वडील वसंतराव पुण्यमूर्तीवार यांचे दीड महिन्यापूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले होते, वडिलांच्या निधनाच्या दुःखातून सावरण्यापूर्वीच मुलाचे अपघाती निधना झाल्याने पुण्यमूर्तीवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पापा यांच्या मृत्यू पश्चात आई, पत्नी, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्यविधी (ता. १३) सोमवारी सायंकाळी चार वाजता दरम्यान वन विभाग तपासणी नाका जवळील डुम्मे नाला मोक्षधाम घाटावर केल्या गेला घटनेचा पुढील तपास एटापल्ली पोलिसांकडून केला जात आहे.
अमरावती : जात पंचायतीचा आदेश न पाळल्याने पती-पत्नीसह दोन मुलांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेच्या तक्रारीवरून जात पंचायतीतील दहा जणांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ५, ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दीपक पांडुरंग पवार, सुधाकर पवार, देवेंद्र सूर्यवंशी, धनराज पवार, शैलेश पवार, मनीष सूर्यवंशी सर्व रा. विलासनगर, अमरावती, किशोर पवार, ज्ञानेश्वर पवार, खेमराज सोळंके तिघेही रा. जुनी वस्ती, बडनेरा व देवा पवार रा. तिवसा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
सविता (काल्पनिक नाव) या तक्रारदार महिलेचे लग्न रितीरिवाजाप्रमाणे झाले आहे. त्यांना दोन मुलेदेखील आहेत. महिलेला दुसरा मुलगा झाला, तेव्हा सविता माहेरी आईकडे होती. त्यावेळी करूणा (काल्पनिक नाव) त्यांच्याकडे आली. मी तुझ्या नवऱ्यापासून गर्भवती आहे. मला तुझ्या नवऱ्यासोबत लग्न करायचे आहे, आता तर तुझ्या नवऱ्याला मला घरात घ्यावेच लागेल, असे करूणा तिला म्हणाली.
करूणा हिने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी सविता हिच्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याबाबत सविताने आपल्या पतीला विचारपूस केली. आपले लग्नापूर्वी करूणासोबत प्रेमसंबंध होते. त्यावेळी तिला लग्नाबाबत विचारले होते. मात्र, तिने लग्न केले नाही, असे सविताच्या पतीने तिला सांगितले. दरम्यान, करूणा हिने विलासनगर येथील संबंधित जात पंचायतीमध्ये सविताच्या पतीविरुद्ध तक्रार केली. त्यावर पंचायतने सविता व तिच्या पतीला बोलावून घेतले. करूणासोबत लग्न कर, असा आदेश यावेळी सविताच्या पतीला देण्यात आला. त्यावर त्यांनी नकार दिला. त्यामुळे जात पंचायतमध्ये असलेल्या संबंधित दहा जणांनी सविता, त्यांचे पती व त्यांच्या दोन मुलांना समाजामधून बाहेर काढल्याचा निर्णय दिला. समाजातील कुणी व्यक्ती सविता किंवा त्यांच्या कुटुंबाशी बोलल्याचे आढळल्यास त्यांनासुद्धा समाजाबाहेर काढून टाकले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. तेव्हापासून आपल्यासह पती व दोन मुलांवर समाजासह नातेवाइकांनीसुद्धा बहिष्कार टाकल्याची तक्रार सविताने गाडगेनगर ठाण्यात दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जातपंचायतींच्या दहशतीमुळे अनेक कुटुंबांना वाळीत टाकण्याचे घडणारे प्रकार माणुसकीला काळिमा फासणारे आहेत. आदेश न पाळल्याने नागरिकांचा जातपंचायतींकडून पद्धतशीर छळ केला जातो. असाच हा प्रकार आहे.
भंडारा
१ जानेवारीच्या दुपारपासून अंगणातून बेपत्ता झालेला ४
वर्षाचा मुलगा अखेर ७० तासांच्या शोधमोहिमेनंतर जंगलात
सुरक्षित सापडला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल
करण्यात आले असून त्याची प्रकृती सामान्य आहे. तुमसर
तालुक्यातील जंगलव्याप्त चिखला गावातील ही घटना आहे.
१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तुमसर
तालुक्यातील चिखला खाण येथील ५२ टाइप क्वार्टर कॉलनीत
नील मनोज चौधरी हा ४ वर्षाचा मुलगा घराच्या अंगणात खेळत
असताना गुढरित्या बेपत्ता झाला होता.
त्याचे अपहरण झाले
असावे किंवा वन्यप्राण्याने त्याला उचलून नेले असावे,
असा अंदाज व्यक्त करीत पोलिसांसह वन विभागाने त्याची
शोधमोहिम सुरू केली होती. शोधासाठी ड्रोनसह
श्वानपथकाचाही वापर करण्यात आला. परंतु, नीलचा शोध
लागत नव्हता.
त्यामुळे प्रशासनात त्याला शोधण्याचे आव्हान होते.
गावातील नागरिकांसह वनविभाग, पोलिस विभागाकडून या
बालकाचा शोध सुरू असतानाच, आज शनिवारी दुपारी एक
वाजताच्या सुमारास नील हा जंगलातील डोंगराच्या पायथ्यावर
सुस्थितीत आढळून आला आणि सर्वांनीच सुटकेचा श्वास
सोडला. त्याला तात्काळ आरोग्य केंद्र गोबरवाही येथे दाखल
केले.
डॉ.वनश्री गिरीपुंजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालकाची प्रकृती सामान्य असून तो धोक्याबाहेर आहे
गेल्या चार दिवसांपासून नील अचानक बेपत्ता झाल्याने संपूर्ण
परिसरात शोककळा पसरली होती. आज तो सापडल्याने संपूर्ण
भागात आनंदाचे वातावरण आहे.
चार दिवसांच्या कडाक्याच्या थंडीत जंगलात नील हा कसा
राहिला, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कुणीतरी नीलला टेकडीवर आणून सोडले असावे, असा
संशयही नागरिकांनी व्यक्त केला आहे. गेल्या चार दिवसांपासून
सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान तो कुठे होता, कुणासोबत
होता, याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे.
त्यानंतरच या रहस्यमय घटनेचा छडा लागू शकणार आहे.
अंगणवाडी स्वयंपाकी महिलांची वेठबिगारी थांबवावी,स्वतंत्र मजूर युनियनची मागणी
प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक/ वैनगंगा वार्ता १९
गडचिरोली- डॉ.ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजने अंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी स्वयंपाकीन महिलांना फक्त १,००० रुपये दरमहा मानधन देऊन शासन या महिलां कडून एक प्रकारे वेठबिगारी करवून घेत आहे. ही वेठबिगारी त्वरित थांबविण्यात यावी अशी मागणी स्वतंत्र मजूर युनियन चे जिल्हा सरचिटणीस गौतम मेश्राम यांनी केली आहे.
उत्तर गडचिरोली जिल्ह्याच्या स्वयंपाकीन महिलांचा मेळावा कुरखेडा येथे नुकताच आयोजिण्यात आला होता त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते तर सामाजिक कार्यकर्ते तुलाराम राऊत, स्वयंपाकीन महिला संगठनेचे नेते कृष्णा चौधरी हे प्रामुख्याने हजार होते.
सदर स्वयंपाकीन महिला मागील नऊ वर्षांपासून १,००० रुपये एवढ्या अत्यल्प मानधनावर काम करून गरोदर मातांची सेवा करीत आहेत. ऊन, वारा, पाऊस या सर्व दिवसात त्या आपले काम नियमितपणे करीत असून वारंवार मागणी करूनही अजूनपर्यंत त्यांचे मानधन वाढविण्यात आलेले नाही, हा या महिलांवर खूप मोठा अन्याय आहे.
तेंव्हा शासनाने त्याचे मानधन त्वरित वाढवून द्यावे व त्यांच्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणीही मेश्राम यांनी यावेळी केली. स्वतंत्र मजूर युनियनतर्फे या समस्ये बद्दल आवाज उचलण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले.
रोहिदास राऊत यांनीही यावेळी मार्गदर्शन करून स्वयंपाकीन महिलांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शासन स्वतःच आपल्या किमान वेतन कायद्याला हरताळ फासत असून ग्रामीण व गरीब महिलांसोबत क्रूर थट्टा करीत असल्याचे ते म्हणाले. शासनाने हि थट्टा त्वरित थांबवावी आणि महिलांना न्याय द्यवा अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.
तुकाराम राऊत यांनी महिलांचे संघटन पुन्हा मजबूत करण्याचे व या अन्याया विरुद्ध आवाज उचलण्याचे आवाहन केले. महिला संघटनेचे कृष्ण चौधरी यांनी प्रास्ताविकातून अंगणवाडी स्वयंपाकीन महिलांच्या समस्या मांडल्या आणि या मागण्या पुढे रेटण्यासाठी हा संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला.
अंगणवाडी स्वयंपाकीन महिलांचे मानधन किमान २०,००० रुपये एवढे वाढविण्यात यावे, त्यांचे मानधन नियमितपणे दरमहा देण्यात यावे, या महिलांचे स्वतंत्र मस्टर बुक ठेवण्यात यावे, साप्ताहिक सुटी देण्यात यावी, सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, पेन्शन लागू करण्यात यावे इत्यादी मागण्यांचे ठराव मेळाव्यात पारित करण्यात आले.
या मेळाव्याला आरमोरी, वडसा कुरखेडा कोरची व धानोरा या पाच तालुक्यांतून दोनशेहून अधिक महिला कामगार उपस्थित होत्या.
दिपालीबावनथडे, संध्या लोंबले, वैशाली नरोटे, वैशाली मडावी, ममता नाकाडे, गायत्री सयाम सीमा गोटा, शकुंतलागावडे, अश्विन गुरनुले, रीमा नैताम, शारदा बर्डे, अंजु गेडाम व अन्य महिलांनी या मेळाव्यासाठी परिश्रम घेतले.
दिं. ०९ जानेवारी २०२५
सावली:- मौजा-अंतरगाव (तालुका सावली, जिल्हा चंद्रपूर) येथे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि समस्त गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यस्मरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचा मुख्य आकर्षण होता भव्य खंजेरी भजन स्पर्धा, ज्यामध्ये ३१ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
मा.खा.नेते यांनी आपल्या विचारात सांगताना *धर्म, संस्कार, आणि राष्ट्रनिर्मितीचे संदेश* या शब्दाचा उल्लेख केला.
या कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी प्रमुख उपस्थिती लावली. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले, “धार्मिक व आध्यात्मिक उपक्रम केवळ संस्कारच नव्हे, तर देश व समाजाच्या उभारणीसाठीही महत्त्वाचे आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर आधारित असे उपक्रम आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहेत.”
अंतरगावावरील आपले प्रेम व्यक्त करताना त्यांनी या गावासाठी सभामंडप बांधून दिल्याचे नमूद केले. गावकऱ्यांनी पुढे आणलेल्या समस्या सोडविण्याचे आश्वासन देत, कार्यक्रमात सहभागी होणे हे आपले भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. “गुरुदेवांचे दर्शन व या पवित्र कार्यात सहभागी होण्याचा योग लाभणे, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे,” असेही ते म्हणाले.
पुढे बोलतांना मा.खा.नेते म्हणाले
या कार्यक्रमाने सामाजिक एकात्मता व संस्कारमूल्ये जपण्याचे कार्य केले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून यशस्वी झाला.असे मि समजतो असे प्रतिपादन या प्रसंगी अशोकजी नेते यांनी केले.
या खंजेरी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचे श्रेय गुरुदेव सेवा मंडळाला जाते. या स्पर्धेचे संचालन जितेंद्र मस्के यांनी करताना सांगितले की, “गेल्या पाच वर्षांपासून ही खंजेरी भजन स्पर्धा अंतरगावात सातत्याने होत आहे. दरवर्षी अशोकजी नेते साहेबांची उपस्थिती व सहकार्यानेच या कार्यक्रमाला गती मिळत असते.नेते साहेब हे माजी खासदार असले तरी आमच्यासाठी ते आजही खासदारच असल्यासारखेच वाटतेय..”
स्पर्धेला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने गुरुदेवांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे काम केले आहे.
या प्रसंगी माजी नगरसेवक श्रीकांतजी भुगुवार, भाजपा तालुका अध्यक्षा व गुरुदेव मंडळाच्या सचिव छायाताई चकबंडलवार, नियोजन समिती सदस्य जितेंद्र मस्के, चंद्रशेखर काचीनवार, लीलाधर नागोसे, गणेश शेट्टीवार, राहुल बोरकुटे यांच्यासह गावातील गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज वंजारी समाज जिल्हा गडचिरोलीचे वतीने वंजारी समाजाचे विरोधात बदनामीकारक विधान करणाऱ्या मनोज जरंगे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावीत या मागणी साठी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौक येथे मोर्चा काढून निषेध दर्शवण्यात आले. तसेच आज मोर्चा काढून निदर्शने करण्यात आले यामध्ये वंजारी समाजाचे बहुसंख्या स्त्री-पुरुष सामील झाले होते . त्यानंतर वंजारी समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक, जिल्हाधिकारी गडचिरोली, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन वंजारी समाजा बद्दल जो बदनामीकारक शब्दप्रयोग करण्यात आले त्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी वंजारी समाजाचे कार्यकर्ते म्हणून चंद्रशेखर भडांगे यांनी केले आहे.
पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा
पत्रकारांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे मागणी
गडचिरोली:-
छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना धमकावणे, मारहाण करणे, त्यांची हत्या करण्यापर्यंत मजल गेली आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांच्या पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढून पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की पत्रकार चंद्राकर यांची खाण माफियांनी निघृण हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करण्यात आले. ही गंभीर बाब आहे. गडचिरोली जिल्हा सुद्धा छत्तीसगडच्या सीमेवर असून जिल्ह्यात सुध्दा अनेक खाण माफिया असून ते मुरुम, रेती माती, गिट्टी या सह गौनखनिज आणि गौन वनोपजांची अवैध वाहतूक करीत असतात. त्यांची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी जाणाऱ्या पत्रकारांना त्यांच्या अशा कुकृत्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत पत्रकार हे निर्भिडपणे आपले काम चोख बजावू शकत नाहीत.
सरकारने पत्रकार संरक्षण कायदा बनविला आहे. मात्र या कायद्याची प्रशासनाकडून प्रभावी पणे अंमलबजावणी करण्यासाठी उचित पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे पत्रकार चंद्राकर यांच्या हत्येनंतर सरकार आणि प्रशासनाने या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. यासोबतच निवेदनाची प्रत केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवली असून चंद्राकर यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि देशभरातील पत्रकारांना उचित संरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली आहे.दुपारी एक वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील पत्रकारांनी गांधी चौकातून बाईक रॅली च्या माध्यमातून मुक मोर्चा काढला. यात जिल्ह्यातील १२ ही तालुक्यातील पत्रकार एकवटले होते. पत्रकारांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हा मुक मोर्चा पोहोचला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या बैठक कक्षात सर्वांना पाचारण करून त्यांच्या मार्फतीने देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदिंसाठी तयार केलेल्या मागण्याचे निवेदन स्वीकारले व ज्येष्ठ पत्रकार हेमंत डोर्लीकर यांचे कडून नेमका विषय समजून घेतला व सदर विषयावर गडचिरोली जिल्हा प्रशासन सकारात्मक भूमिका घेतानाच पत्रकारांच्या तीव्र भावना राज्य सरकार पर्यंत पोहोचविल असे आश्वासन दिले. यानंतर पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सुध्दा निवेदन देऊन आपल्या मागण्या पोलीस प्रशासनापुढे ठेवल्या. जिल्हा पोलीस अधीक्षकांचे वतीने अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी निवेदन स्वीकारले.मोर्चाचे संयोजक पत्रकार मुनीश्वर बोरकर, गडचिरोली प्रेस क्लबचे सुरेश पद्मशाली, ज्येष्ठ पत्रकार हेमंत डोर्लीकर, गामाचे संयोजक उदय धाकाते, व्हाइस ऑफ मिडीयाचे जिल्हाध्यक्ष व्येंकटेश दुडमवार, लोकमत पत्रकार संजय तिपाले, जयंत निमगडे, मुकुंद जोशी, प्रल्हाद म्हशाखेत्री, प्रकाश ताकसांडे, प्रकाश दुबे जगदिश कन्नाके, मारोती भैसारे विलास ढोरे, सुरज हजारे, राजरतन मेश्राम, प्रा. दिलीप कहूरके, कालीदास बुरांडे, नासिर जुम्मन शेख, हेमंत हुनेदार, रेखाताई वंजारी, विजयाताई इंगळे, तिलोतमा हाजरा, मंगेश भांडेकर, महेश सचदेव, दिनेश बनकर, कृष्णा वाघाडे, हस्ते भगत, नाझिर शेख, भाविकदास कळमकर, मुकेश हजारे, संदिप कांबळे, विनोद कुळवे, किशोर खेवले, सोमनाथ उईके निलेश सातपुते, श्रीमंत सुरपाम, शंकर ढोलगे हर्ष साखरे, कबिर निकुरे, प्रमोद राऊत, विजय शेडमाके, टावर मडावी, उमेश गझपल्लीवार, पुंडलिक भांडेकर, अनुप मेश्राम, श्रावण वाकोडे, कालिदास बुरांडे, धनराज वासेकर, विलास वाळके, गोर्वधन गोटाफोटे, रवि मंडावार, राजेश खोब्रागडे, चोखोबा ढवळे, सतिश ढेंभुर्णे गेडाम, धम्मपाल दुधे, नाजुक भैसारे या सह जिल्हयातील शंभराहून अधिक पत्रकार उपस्थित होते.
दिनांक: ०७ जानेवारी २०२५
सावली तालुक्यातील आसोला (चक, मेंढा) आणि सावंगी दीक्षित या पुनर्वसित गावांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, मुल येथे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
अशोकजी नेते यांनी गावकऱ्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, "आपल्या गावांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुनर्वसन खात्याच्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. शासन दरबारी निवेदन सादर करून आणि अधिकारी वर्गासोबत बैठक घेऊन लवकरच यावर तोडगा काढला जाईल."
*चर्चेतील मुख्य मुद्दे:*
या बैठकीत पुनर्वसित गावांच्या शेती मोबदला, प्रकल्पग्रस्त दाखल्याचा पुरवठा, अनुदान आणि अन्य मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
*पुनर्वसित गावांच्या मुख्य मागण्या:*
१) २०१८-१९ मध्ये भूसंपादनानंतर शिल्लक शेती विक्रीसाठी परवानगी.
२) भूसंपादन झाल्यानंतर सामुग्रह अनुदान मंजूर करणे.
३) १८ वर्षांवरील कुटुंबांना मोबदला व अनुदान देणे.
४) विवाहित कुटुंबांसाठी वाढीव अनुदानाचा पुरवठा.
५) १८ वर्षांवरील मुलांना मोबदला व अनुदान देणे.
६) शासन निर्णयानुसार पाच लाख रुपये अनुदानासह प्रकल्पग्रस्त दाखल्याचा पुरवठा.
७) पुनर्वसन समितीच्या नियमित बैठका आयोजित करणे.
*उपस्थित मान्यवर:*
या बैठकीला उपविभागीय अधिकारी अजयजी चरडे, गोसीखुर्द प्रकल्पाचे अभियंता चिंतलवार, सिंचाई व पुनर्वसन विभागाचे अधिकारी तसेच भाजपा तालुका महामंत्री व नगरसेवक सतिश बोम्मावार, माजी जिल्हा परिषद सदस्य यशवंतजी ताडाम, पुनर्वसन समितीचे सदस्य इंदरशहा पेंदाम, मुखरु जुमनाके, होमराज वलादे, राकेश सुरपाम, श्रावण गेडाम, सोमेश्वर पेंदाम यांसह आसोला चक (मेंढा) व सावंगी दीक्षित गावातील ४०-५० नागरिक उपस्थित होते.
Chandrapur Missing News: सोनापूर गावातील दोन चिमुकलींसह 31 डिसेंबरपासून वडील बेपत्ता आहेत. त्यामुळे कुटुंबीयांसह गावामध्ये चिंतेचे वातावरण आहे. या संदर्भात कुटुंबीयांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. वडील नशेमध्ये तर्रर्र राहत असल्याने आपल्या चिमुकलींचे काय हाल होत असतील, ती कुठे असतील, याबाबत मुलीच्या आईसह आजी, आजोबांची काळजी अधिकच वाढली आहे. दरम्यान, पोलिसांनी शोधकार्य सुरू केले आहे. मंगेश भांडेकर असे वडिलाचे, तर शिवण्या (8) व यशिका (5) वर्ष अशी चिमुकलींची नावे आहेत.
मंगेश भांडेकर याला दारूचे व्यसन असून पत्नी, आई, वडील यांना नशेत अनेकदा मारहाण करीत असल्याची गावात चर्चा आहे. त्यामुळे मागील एक वर्षापासून पत्नी आशा भांडेकर ही चामोर्शी तालुक्यातील दोटकुली येथे माहेरी लहान मुलींसह राहत होती. मोठ्या मुलीची शाळा असल्याने ती आजी-आजोबाकडे सोनापूर येथे राहत होती. आशा रोवणीच्या कामाला तेलंगणा येथे गेली असता, मंगेश भांडेकर लहान मुलीला, तसेच सोनापूर येथील मुलीला घेऊन 31 डिसेंबरपासून बेपत्ता झाला आहे.
तो दारूच्या नशेत नेहमी राहत असल्याने व कुठे आहे, याची माहिती कुणालाच नसल्याने कुटुंबीय चिंतेत पडले आहेत. आजी- आजोबांनी 2 जानेवारी रोजी पोलिस स्टेशनला तक्रार दिली, तर आई आशा भांडेकर हिने उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तक्रार दिली. त्यानंतर, शोधकार्य सुरू केले आहे. बाल संरक्षण विभागाची टीमही त्यांच्या शोधकार्यात लागली आहे, परंतु अद्यापही तिघांचाही पत्ता लागला नसल्याने कुटुंबीयांची चिंता अधिकच वाढली आहे.
ग्रामपंचायतचे उपसरपंच मुकेश भुरसे यांनी मंगळवारी (दि. 7) मंगेश भांडेकर याचे वडील बंडू भांडेकर व पत्नी आशा यांना घेऊन पोलिस स्टेशन गाठले, तसेच तपास करण्याची मागणी केली. यावेळी ठाणेदार पुल्लुरवार यांनी पोलिस यंत्रणेमार्फत शोधमोहीम सुरू असल्याचे सांगितले.
Bhandra News: लाखांदूर : वडिलांनी रागावल्यामुळे सुमारे दोन महिन्यांपूर्वी घर सोडून निघून गेलेल्या कोच्छी येथील 24 वर्षीय युवकाचे प्रेत गावालगतच्या जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. मास गळलेल्या आणि सडलेल्या स्थितीतील प्रेत पोलिसांनी गावकरी आणि त्याच्या पालकांकडून शहानिशा करून ओळखले. विनोद ताराचंद मेश्राम असे या मृत युवकाचे नाव आहे.
मागील 2 महिन्यांपूर्वी वडिलांनी हटकले असता नाराज झालेल्या मुलाने स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. 6 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास कोच्छी येथील जंगल परिसरात या घटनेचा उलगडा झाला.
विनोद मेश्राम हा युवक 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास चुलबंद नदीवर मासे पकडण्यासाठी गेला होता. वडिलांनी त्याला मोबाइलवर कॉल केला, पण विनोदने कॉल रिसिव्ह केला नाही. यावर रागावलेल्या वडिलांनी त्याला घरात परतल्यावर हटकले. त्यामुळे नाराज झालेल्या विनोदने घर सोडले आणि दोन महिन्यांपासून तो बेपत्ता झाला होता.
6 जानेवारी रोजी काही महिला जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या असता त्यांनी एका झाडाला लटकलेल्या मृतदेहाची ओळख घेतली. मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत होता, आणि दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या विनोदचा तो प्रेत होता. महिलांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली. विनोदचे पालक व पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन प्रेताची ओळख पटवली.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या घटनेचे कारण आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले असून, वडिलांच्या रागावरून युवकाने आपला जीवन संपवले.
गडचिरोली -
झाडीपट्टीचा पुन्हा एकदा गौरव
संत चोखामेळा, संत दामाजी, संत कान्होपात्रा आदी १४ संत ज्या जन्मभूमीने दिले,व पंढरपूरच्या विठूरायांची ज्या नगरीवर कृपादृष्टी आहे, त्या मंगळवेढा गावातील शब्दकळा साहित्य संघाच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट साहित्यस्पर्धा घेण्यात येते.व साहित्यिकांना त्यांच्या दर्जेदार साहित्यनिर्मीती साठी 'शब्दकळा उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने' पुरस्कृत करण्यात येते. व दहा विजेत्या साहित्यिकांना मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात येते.शब्दकळा साहित्य संघाच्या स्पर्धेचे हे चोविसावे वर्ष आहे.
महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात विशेष मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी नाट्य वाड्.मय प्रकारात यावर्षी झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या 'महापूजा' या महानाट्याची 'शब्दकळा उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार - २०२४' साठी निवड करण्यात आली.
दि.०५ जानेवारीला सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात झालेल्या भव्यदिव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. लक्ष्मणराव ढोबळे (मा.पालकमंत्री सोलापूर) व मा.आम. समाधान (दादा) अवताडे (वि.प.सदस्य पंढरपूर मंगळवेढा), व मा. दत्तात्रय सावंत(वि. प. सदस्य, पुणे) यांचे हस्ते प्रा.शिवाजीराव काळूंगे (संचालक धनश्री परिवार), शिवानंद पाटील (चेअरमन, दामाजी शुगर), डॉ. शिवाजी शिंदे (सहा.कुलसचिव, अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, सोलापूर), डॉ. सुरेश शिंदे (ज्येष्ठ कवी), टि.एस.चव्हाण, डॉ.महादेव देशमुख, प्रा.दिलीप जाधव, हरिष बंडीवढार, मनोहर मुधोळकर, श्रीमंत लष्करे, प्रा.डॉ. वामनराव जाधव,ॲड. नंदकुमार पवार इ. साहित्यिक, व प्रा.डॉ. शशिकांत जाधव (स्पर्धा प्रमुख तथा साहित्यिक) यांच्या उपस्थितीत या वर्षातील दर्जेदार साहित्यिकांना सन्मानित आले. त्यात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनाही त्यांच्या 'महापूजा अर्थात महासती सावित्री' या नाटकाचे लेखनासाठी शब्दकळा उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार -२०२४ या पुरस्काराने सपत्नीक गौरविण्यात आले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व मानाचा फेटा असे पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, विजेते साहित्यिक व गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.
'महापूजा' हे संपूर्ण झाडीपट्टीत गाजलेले महानाट्य असून या महानाट्याचे १०० च्या वर प्रयोग सादर झालेले आहेत .
-------------------------------------------
विशेष म्हणजे 'महापूजा' नाटकास यापूर्वी नागपूर येथील 'साहित्य विहार', व बोरगाव (जि. सांगली) येथील 'आधार प्रतिष्ठान' या संस्थेतर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट वांड्.मय पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले असून यंदाचा तिसऱ्यांदा मिळालेला हा वाड्.मय पुरस्कार आहे. यामुळे संपूर्ण झाडीपट्टीची मान उंचावली आहे.
----------------------------------------------
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे, प्रा. यादव गहाणे, प्रा. डॉ. श्याम मोहरकर, प्रा. डॉ.जनबंधू मेश्राम,प्रा. डॉ. योगीराज नगराळे, प्रा.डॉ. राजकुमार मुसणे, डॉ. दिपक चौधरी, रमेश निखारे, नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, राजेंद्र जरुरकर, प्रा. नवनीत देशमुख(साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे प्रकाशक पराग लोणकर, व इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.
झाडीबोली साहित्य मंडळाची काव्यमैफल संपन्न.
गडचिरोली - दिनांक 4 जानेवारी रोजी नववर्षाच्या पर्वावर झाडीबोली साहित्य मंडळाची सभा प्रा. विनायक धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत झाडीबोली प्रातिनिधिक कवितासंग्रह काढण्याबद्दल चर्चा झाली. ह्या कवितासंग्रहाचे संपादक कवी डॉ. प्रवीण किलनाके असतील . हा झाडीबोली कवितांचा एकमेव काव्यसंग्रह असणार आहे. हयात वाचकाना विविध विषयावरच्या कविता वाचायला मिळतील असे सचिव संजीव बोरकर ह्यांनी सांगितले.
ह्या निमित्याने मंडळाच्या सभागृहात सायंकाळी ४ वाजता छोटेखांनी काव्यमैफल घेण्यात आली.ह्या मैफलीत
सल्लागार डॉ. चंद्रकांत लेनगुरे, उपाध्यक्ष डॉ. प्रवीण किलनाके, वर्षा पडघन, संजीव बोरकर,उपेंद्र रोहनकर, जितेंद्र रायपुरे, कमलेश झाडे, गजानन गेडाम,खेमराज हस्ते,प्रेमीला अलोणे,मालती सेमले, रोशणी दाते, प्रतीक्षा कोडापे, ह्यांनी विविध विषयावर आपल्या झाडीबोलीत कविता सादर केल्या." घाटरु" ही प्रा. विनायक धानोरकर ह्यांची कविता विशेष दाद देऊन गेली. कार्यक्रमाचे संचलन वर्षा पडघन ह्यांनी केले.तर आभार गजानन गेडाम ह्यांनी मानले.
मेहा बुजरुक -:
ता सावली येथे इयत्ता ७ वी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहेत. ह्यात ७ शिक्षक आणि १ मुख्याध्यापक यांची गरज आहे. पण मागील २ वर्षापासून फक्त ४ शिक्षक आणि १ मुख्याध्यापक कार्यरत आहेत. त्यामुळे एकाच वेळेस दोन अलग वर्गाला शिकवल्या जात आहेत. त्यामुळे ह्यात गरीब आणि खेड्यातील विद्यार्थाचा खूप मोठा शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. आणि त्यांचा भविष्यात खूप मोठा फटका ह्या गोष्टीमुळे शेकडो विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याला बसेल. आणि पालक हे गरीब असल्यामुळे ते त्यांना बाहेर शिक्षणासाठी पाठवू शकत नाही त्यामुळे त्यांच्या पुन्हा नुकसान होईल. आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकास होणार नाही आणि त्यांचे भविष्य हे अंधारमय होईल.
त्यामुळे ह्या विरोधात एक महिन्याच्या आता मेहा बुजरुक येथे ३ शिक्षक तसेच सावली तालुक्यात जिथे जिथे शिक्षक कमी आहेत अश्या सर्व ठिकाणी शिक्षक द्यावेत. अन्यथा न दिल्यास मोठा आंदोलन संपूर्ण सावली तालुक्यातून छेडण्यात येईल.
ह्या विरोधात जितूभाऊ धात्रक, प्रकाशजी कोलते, नंदाजी पेंदाम, सरपंच रुपेशजी रामटेके, चिमणदासजी निकुरे,देवरावजी गेडाम, वामनजी कोरडे, किशोरजी गंडाटे,कांतेशजी बानबले, मदनजी निकुरे, सुभाषजी ढोलणे तसेच इतर महिला उपस्थित होत्या.