PostImage

Rushi Sahare

April 6, 2024   

PostImage

शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवारांसाठी जाहीरनामा ... लेखी मान्यता दिली तरच …


गडचिरोली : जिल्ह्यात सामान्य माणसांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर काम करीत असल्यानेच मोठ्या प्रमाणावर शेतकरी कामगार पक्षाचे आकर्षण जनतेमध्ये आहे. अशा स्थितीत निवडणूकीला सामोरे जाणाऱ्या उमेदवारासाठी प्रचार कामी मदत करण्यापूर्वी जनतेच्या ज्वलंत मुद्यांची जाणीव करून देवून सदर मुद्दे ज्या उमेदवाराला मान्य असतील अशा लोकशाही, संविधान समर्थक उमेदवारासाठीच काम करावे, असा रेटा सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील शेकाप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चालविला आहे. नेत्यापेक्षा पक्षाचे विचार आणि सामान्य पक्ष सभासद कार्यकर्ते हाच पक्षाचा आत्मा असल्याने, शेतकरी कामगार पक्ष इंडिया आघाडीतील घटक असतानासुद्धा स्थानिक खालील मु‌द्यांवर संविधान आणि लोकशाही समर्थक उमेदवाराची लेखी संमती मिळाली तरच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पक्ष सभासद पूर्ण ताकदीने काम करतील असे ठरविण्यात आले आहे.

1) ओबीसींना मिळालेले 19% आरक्षण जेव्हा 6% टक्के करण्यात आले, त्याचवेळीच घटना आणि लोकशाही धोक्यात आणल्या गेली. आज कोणाला संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल तर त्यांनी सर्वप्रथम गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण 19% पूर्ववत करावे.

2) विदर्भात मोठ्या संख्येने असलेल्या डिवर, केवट, कहार, भोई व तत्सम भटक्या जमातींची लोकसंख्या मोठ्याप्रमाणावर असल्याने भटक्या जमाती (ब) (N.T.- B) चे 2.5 आरक्षण 5 टक्के करण्यात यावे.

3) गडचिरोली जिल्‌ह्यात 5 वी आणि 6 वी अनुसूची लागू करण्यात येवून पूर्ण अनुसूचीत क्षेत्र असलेल्या तालुक्यांची जिल्ह्यात स्वतंत्र स्वायत्त जिल्हा परिषद मंजूर करण्यात यावी.

4) गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस सरकारच्या काळात प्रस्तावित व मंजूर झालेल्या आणि भाजप सरकारच्या काळात बळजबरीने खोदण्यात येत असलेल्या सर्व लोह खाणी कायमस्वरुपी रद्द करा.

5) कलम 110, 107 रद्द करण्यात यावा.

6) राज्य सरकारने 35 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक अनुदान कृषी बजेटमधून वीज वितरण कंपनीला दिले आहे. यामुळे कृषीपंपाच्या वीजबिलाची रक्कम शेतकऱ्यांना देणे लागत नाही. करीता शेतकऱ्यांना बारमाही 24 तास मोफत वीज पुरवठा करण्यात येईल, असा कायदा करण्यात यावा.

7) गडचिरोली जिल्हयातील वनसंपदेवर आधारीत उ‌द्योगनिर्मिती करण्यात येवून तरुणांना रोजगार देण्यासाठी F-SEZ (Forest special Economic Zone) तयार करण्यात यावा.

8) मोहफुलापासून मद्यनिर्मिती ला चालना देवून मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर 'मोहफुलाच्या दारुला' Traditional (पारंपरिक) दर्जा देण्यात यावा.

9) स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीत 80% आरक्षणाचा कायदा करण्यात यावा.

10) गडचिरोली जिल्ह्यातील नदी काठावरील गावाच्या ग्रामसभांना रेती उत्खनन व विक्रीचे अधिकार देण्यात येवून उत्पन्न आणि रोजगाची संधी देण्यात यावी.

11) गडचिरोली जिल्ह्यात गोंडी भाषिक प्राथमिक शाळा सुरु करण्यात याव्यात.

12) पटसंख्येच्या कारणाने गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळा बंद करण्याचे धोरण रद्द करण्यात यावे.

13) जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षणासह सर्व विभागांतील रिक्त पदांची तातडीने नोकर भरती तातडीने करण्यात यावी.


PostImage

Rushi Sahare

April 1, 2024   

PostImage

शेतकरी कामगार पक्ष कोणाच्या बाजूने ? दोन दिवसांत जिल्हा समिती …


 

गडचिरोली : शेतकरी कामगार पक्ष इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. मात्र  जिल्ह्यातील खदानविरोधी आंदोलन, बळजबरी भूसंपादन, रेती तस्करी, पाचवी अनुसूची, पेसा - वनहक्क कायद्यांची अंमलबजावणी, ओबीसी आरक्षण, भटक्या जमातींचे विविध प्रश्न या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांने कधीच स्पष्ट भूमिका घेतली नसल्याने शेतकरी कामगार पक्षाने वेगळी भूमिका घेत आता योग्य उमेदवारासाठी काम करण्यासाठी येत्या दोन दिवसांत जिल्हा समीतीची बैठक आयोजित करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

उल्लेखनीय कि, जिल्ह्यातील प्रस्तावित आणि मंजूर लोह खाणींना स्थानिक ग्रामसभांच्या असलेल्या खदान विरोधी भूमिकेला शेतकरी कामगार पक्षाने सुरुवाती पासूनच समर्थन देवून नेतृत्व केले आहे. मात्र महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी ग्रामसभा सोबत दगाबाजी करत वेळोवेळी रोजगार मिळण्याच्या नावाखाली प्रकल्प आणि खाणींचे समर्थन केले आहे. ओबीसी आरक्षण, भटक्या जमातींचे विविध प्रश्न,  पेसा - वनाधिकार, पाचवी अनुसूची, रेती तस्करी, बळजबरी भूसंपादन याबाबत जिल्ह्यात भाजपची जी भूमिका आहे, तिच भूमिका काॅंग्रेस आणि महाविकास आघाडीची असल्याने जिल्हावासीयांची दिशाभूल होत आहे. अशा परिस्थितीत सामान्य माणसाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोणासाठी काम करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच काही उमेदवारांनी शेतकरी कामगार पक्ष आपल्यासाठी काम करणार असल्याचे गृहीत धरले असून न विचारता बॅनर, पोस्टर वर पक्षाच्या नावाचा उल्लेख करण्याचा खोडसाळपणा करीत आहेत. मात्र शेतकरी कामगार पक्ष खदानसमर्थक व ग्रामसभा विरोधी भूमिका असणाऱ्यांच्या सोबतीला जाणार नसून योग्य उमेदवारासाठी काम करण्याबाबत जिल्हा बैठक आयोजित करुन सर्व संमतीने निर्णय घेण्यात येईल असे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जयश्रीताई जराते, जिल्हा सह चिटणीस भाई रोहिदास कुमरे, युवक जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, जिल्हा सचिव देवेंद्र भोयर यांनी कळविले आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

March 13, 2024   

PostImage

विधवा महिलांना कर्जमुक्ती केव्हा ?शासनाकडून विधवा महिलांची अवहेलना होत असल्याचा …


रुमदेव सहारे सहसंपादक 

Covid-19 मुळे विधवा झालेल्या महिलांना थकीत कर्जातून मुक्तता देण्यासंदर्भात शासन स्तरावर निर्णय घेण्यासाठी सहकार आयुक्तांनी राज्यातील सर्व विभागीय निबंध व जिल्हा निबंधकांना 11 नोव्हेंबर 2022 व 16 जानेवारी 2023 च्या आदेशान्वये माहिती गोळा करून ती माहिती 20 जानेवारी 2023 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले होते  या आदेशामुळे मृतकर्जदाराच्या विधवा महिलांच्या कर्जमुक्त होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.  परंतु आता एक वर्ष उलटून सुद्धा विधवा महिलांना कर्जमुक्तीचा दिलासा मिळाला नाही. त्यामुळे आता हे कर्ज कसे  फेडायचे ? असा मोठा प्रश्न त्या विधवा महिलांसमोर आहे.  राज्य सरकारने येणाऱ्या लोकसभा डोळ्यासमोर ठेवून मते मिळवण्यासाठी 11 व 12 मार्च या दोन दिवसात जवळपास 250  चे वर शासन निर्णय निर्गमित करून हजारो करोड रुपयाच्या सोयी सुविधा जनतेला दिल्यात. तर केंद्र सरकारने उद्योगपतींचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ केले. परंतु मृतक कर्जदारांच्या विधवा महिलांच्या  कर्जमुक्ती कडे मात्र  मागील एक वर्षापासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गडचिरोली जिल्हा सहकारी पतसंस्था संघाचे मानद सचिव तथा सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रा. शेषराव  येलेकर यांनी केला आहे. एकीकडे  महिलांच्या उन्नतीसाठी राज्यात महिला धोरण जाहीर करून आम्ही महिलांचे तारणहार असल्याचा गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे मात्र त्याच राज्यातील विधवा महिलांना मागील एक वर्षापासून कर्जमुक्तीचे गाजर दाखऊन त्यांची  अव्हेलना करायची हा कुठला न्याय आहे ?  असा सवाल प्रा येलेकर यांनी केला आहे.

    कोविड 19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेकांवर आर्थिक अडचणी  ओढविल्या.ज्या कुटुंबातील कर्तापुरुष कोरोनात मृत्यू पावला त्या कुटुंबांना मोठी आर्थिक झड बसली आहे. त्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी कर्ता पुरुषाच्या विधवा पत्नीवर आली आहे. मयत कर्जदाराचे राहते घर इतर मालमत्ता तारण असल्यास अशावेळी त्याच्या कुटुंबावर बेघर होण्याची पाळी आली आहे, या संदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून विचारणा केली असता शासनाने मागितलेली माहिती दिलेल्या वेळेत सहकार आयुक्त कार्यालय पुणे येथे पाठवण्यात आली, परंतु अजून पर्यंत कोणताही निर्णय शासन स्तरावर झाला नसल्याचे त्यांच्याकडून  सांगण्यात आले. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न निकाली लागून मृतकर्जदाराच्या विधवा महिलांना थकीत  कर्जातून  मुक्तता मिळेल असे वाटत होते, परंतु त्या अभागी महिलांच्या पदरी मात्र निराशाच आली. पुढील लगतच्या काळात तरी विशेष बाब म्हणून सदर विधवा महिलांना कर्जमुक्ती मिळेल काय ? असा प्रश्न प्रा. शेषराव येलेकर यांनी  शासनाला केला आहे.


PostImage

Rushi Sahare

March 3, 2024   

PostImage

पायाभूत सुविधा बळकट करत गरीब, शेतकरी, युवक व महिलांचे कल्याण …


 मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनात दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी राज्याचे मुख्यमंत्री नामदार  एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री नामदार  अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा सन २०२४-२५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. 

सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प देशाचे पंतप्रधान  नरेंद्रजी मोदी यांनी मांडलेल्या विकसित भारत संकल्पने नुसार राज्यातील शेतकरी, गरीब , युवक, महीला या ४ प्रमुख जातींचे सर्वांगीण विकास व कल्याण करणारा आहे. अर्थसंकल्पातुन प्राधान्याने रस्ते, विज, आरोग्य या मुलभुत सुविधांवर भर देण्यात आला असुन शेतकरी, युवक, महीला व गरिब कल्याणांच्या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. एकंदरीत राज्यातील सर्व घटकांच्या विकासासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.


PostImage

Rushi Sahare

March 1, 2024   

PostImage

जिल्हयात ८४ हजार बालकांना पोलिओ डोज देण्याचे उद्दिष्ट ३ मार्च …


 

ऋषी सहारे

गडचिरोली, : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवार दिनांक ३ मार्च २०२४ रोजी जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील ८४ हजार १८१ बालकांना पोलिओ डोज देण्याचे उद्दिष्ट असून यासाठी एक लाख पोलिओ डोस उपलब्ध करून घेण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दावल साळवे यांनी आज दिली.

भारतात एकही पोलिओग्रस्त रुग्ण आढळणार नाही, याकरीता यावर्षीसुध्दा शासनातर्फे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची फेरी दिनांक ३ मार्च २०२४ रोजी राबविण्यात येत आहे. या दिवशी ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना बुथवर पोलिओ लस पाजण्यात येणार आहे व १०० टक्के बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत ग्रामीण भागात २१४५ तर शहरी भागात ४९ अशी एकूण २१९४ लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात करण्यात आली आहेत. या व्यतिरीक्त बसस्टॉप, रेल्वेस्टेशन, यात्रास्थळे या ठीकाणी प्रवासात असलेल्या किंवा स्थलांतरीत होत बालकांकरिता ग्रामीण भागात १११ व शहरी भागात २० अशा एकूण १३१ ट्रान्झिट टिम नियुक्त करण्यात आल्या आहेत. तसेच अस्थायी निवास असलेल्या, विटभट्टी, लहान पाडे आदि ठिकाणीसुध्दा लसीकरणासाठी १८४ मोबाईल टिमची व्यवस्था करण्यात आली आहे.

पल्स पोलिओ लसीकरणापासून एकही पात्र बालक वंचित राहता कामा नये. स्थलांतरीत तसेच रस्त्यांवरील बालकांच्या लसिकरणाकडे विशेष लक्ष द्यावे. जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन जनजागृती करावी अशा सूचना जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिल्या आहेत. तर योग्य समन्वयातून लसीकरण मोहिमे १०० टक्के यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी केले.


PostImage

Rushi Sahare

March 1, 2024   

PostImage

निवडणूक यंत्रणेचा आढावा... निवडणूकीची कामे जबाबदारीपूर्वक पूर्ण करा- जिल्हाधिकारी


 

ऋषी सहारे

गडचिरोली - लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नेमून दिलेली कामे नियमांचे पालन करून जबाबदारीपूर्वक व विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय मीणा यांनी आज दिले.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील निवडणूक विषयक विविध कामे सुरळीत पार पाडण्यासाठी समन्वय अधिकारी व सहाय्यक यांना नेमून दिलेल्या कामकाजाच्या अनुषंगाने श्री संजय मीणा यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा घेतला. उप जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा सूचना अधिकारी एस.आर. टेंभुर्णे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, तहसिलदार प्रीती डुडुलकर आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

या बैठकीत भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक निवडणूकीचे कामकाज टप्पेनिहाय पार पाडण्यासाठी दिलेल्या कालमर्यादेची माहिती देण्यात आली. कामकाज करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. कामे नेमून दिलेल्या विषय समितीने कोणकोणती कामे करावी याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

निवडणूक विषयक कामकाजासाठी जिल्हाधिकारी मीणा यांनी विविध शाखानिहाय समन्वयक व सहाय्यक अधिकारी कर्मचारी नेमले आहेत. यात पत्रव्यवहार, नामनिर्देशन, आय.टी. सेल, वाहतूक व्यवस्था, मतपत्रिका, निवडणूक साहित्य, आदर्श आचार संहिता, मतदार यादी, प्रसिद्धी, इ.व्ही.एम. सुरक्षा कक्ष, निवडणूक खर्च, मतदार मदत केंद्र, मनुष्यबळ व्यवस्थापन आदि २७ शाखांचा समावेश आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 29, 2024   

PostImage

बहुजनवादी राजकारण हाच सक्षम पर्याय ,ॲड. सुरेश माने यांची शेकाप …


गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक आणि जातीयवादी जनविरोधी धोरणांना शह देण्यासाठी बहुजनवादी राजकारण करणे हाच सक्षम पर्याय आहे. त्यामुळे स्पष्ट वैचारीक भूमिका असणाऱ्या पक्षांची आघाडी असणे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जाणे गरजेचे असल्याचे मत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सुरेश माने यांनी व्यक्त केले. 

बिआरएसपीच्या कार्यकर्ता बैठकीनिमित्य ॲड. सुरेश माने गडचिरोलीत आले होते. त्यानिमित्त त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यादरम्यान चर्चा करतांना ते म्हणाले की, देशातील जनता भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक आणि जातीयवादी अजेंड्याला सामान्य जनता कंटाळली आहे. अशावेळी प्रमुख विरोधी पक्ष काॅंग्रेसने सर्वांना एकत्र घेवून येणाऱ्या निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. तसे झाले नाही तर किमान प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीतील बहुजनवादी विचारांच्या पक्षांनी स्पष्ट भूमिका घेवून निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी स्थानिक स्तरावरील बांधणीचे नियोजन करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 

शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य भाई रामदास जराते यांनी ॲड.सुरेश माने यांचे शेकापच्या वतीने स्वागत केले. यावेळी बिआरएसपीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष ॲड. विशेष फुटाणे, प्रदेश सचिव भास्कर बांबोळे, जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, शेकापचे जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई जराते, दिक्षा रामटेके, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 11, 2024   

PostImage

तरुणाची गळफास घेवुन आत्महत्या.! गळफास घेणारा तरुण ब्रम्हपुरी तालुक्यातील


आरमोरी:-

आरमोरी ब्रहापुरी मार्गावर एका तरुणाने बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबजनक घटना दिनांक :- १० जानेवारी २०२४ घडली. आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे.संदीप श्यामराव ठाकरे (३०, रा. आवळगाव, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर) असे गळफास घेणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सचिन हा  तीन दिवसांपूर्वी कामानिमित्त स्वगाव आवळगाव येथून गडचिरोलीला गेला होता. त्यानंतर तो ट्रॅव्हल्सने आरमोरीत पोहोचला. ब्रह्मपुरी रोडवर असलेल्या एका राईस मिलजवळ बाभळीच्या झाडास साडीने गळफास लावून त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी धाव घेत मृतदेह फासावरून उतरवून ओळख पटविली. आरमोरी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद आहे.सचिनच्या पच्छात्य आई बाबा पत्नी मुलगी असा लहानगा परीवार आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 9, 2024   

PostImage

आशा वर्कर, गट प्रवर्तक,अंगणवाडी सेविका,शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे मा.मुख्यमंत्री …


 गांधी चौकात आयटक चा,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,जवाब दो आंदोलन! 

गडचिरोली:- 
संप काळात सरकारने केलेल्या घोषणा नुसार गटप्रवर्तक महिलांना दरमहा दहा हजार रुपये मानधन वाढ, दरमहा आरोग्यवर्धिनीचे पंधराशे रुपये , कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क व दिवाळी बोनस. तसेच आशा महिलांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ  देण्याचा जीआर तात्काळ काढा,अंगणवाडी सेविकांना 26 हजार रू. मदतनीसला वीस हजार रु किमान वेतन, पेन्शन, ग्राजूयटी लागू करा.शालेय पोषण आहार कर्मचाऱयांना किमान वेतन श्रेणी मिळे पर्यंत 15 हजार रु.मानधन लागू करा.शिक्षण मंत्र्यांनी केलेल्या घोषणे नुसार मासिक 1500 रू. मानधन वाढीचा जी आर काढा या प्रमुख मागणीसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली येथे 9 जानेवारी 2024 रोजी प्रशासनाच्या वतीने आयोजित महिला सक्षमीकरण मेळावा करिता मा.मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांचा नियोजित दौरा असल्याची माहिती आयटक पदाधिकारी यांना मिळाल्याने त्यांना जाब विचारण्यासाठी गडचिरोली येथील गांधी चौकात आयटक च्या नेतृत्वात योजना कर्मचाऱ्यांचा जवाब दो!आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता.परंतु आंदोलन करण्याच्या 1 दिवसापूर्वीच आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांना सकाळीच ब्रम्हपुरी वरून तर जिल्ह्याधक्ष कॉ.देवराव चवळे यांना गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेऊन नजर कैद करण्यात आले आणि आंदोलन मागे घेण्याकरिता दबाव आणला जात होता परंतु जो पर्यंत मुख्यमंत्री यांच्या सोबत भेट घडवून आणल्या शिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी टाटर भूमिका आयटक पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने शेवटी पोलिस अधीक्षक यांनी मुख्यमंत्री सोबत भेट करून देणार असल्याचे मान्य केल्याने गांधी चौकातील राजीव गांधी पटांगणात सकाळी 11 वाजता पासून हजारो योजना कर्मचाऱ्यांनी  जवाब दो !आंदोलनात  सरकार विरोधात तीव्र नारेबाजी करन्यात आली .शेवटी आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे, जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.ड्रा.महेश कोपुलवार,कॉ.सरिता नैताम, कॉ.फर्जणा शेख, कॉ .वनिता कुंठावार,राधा ठाकरे यांच्या शिषटमंडळाने मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन चर्चा केली.18  डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात आयटक महामोर्चात ठरल्या नुसार  लवकरच मुंबई मंत्रालयात बैठक घेऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
जवाब दो!आंदोलनात आयटक चे कॉ.विनोद झोडगे, जिल्हाध्यक्ष देवराव चवळे कॉ.ड्रॉ.महेश कोपुलवार यांच्यासह अनेक नेत्यांनी मार्गदर्शन करत सरकारचा खरपूस समाचार घेतला.एकीकडे सरकार ने दोन महिन्यापूर्वी संप काळात घोषणा करूनही आशा वर्कर, गट प्रवर्तक,कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढ,दिवाळी बोनस चा जी आर काढायला  वेळ नाही तर अंगणवाडी सेविकांचा 36 दिवस झाले राज्यव्यापी संप सुरू आहे परंतु तोडगा काढायला सरकार जवळ वेळ नाही,केंद्र सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून शालेय पोषण आहार कर्मचाऱयांनच्या मानधनात वाढ केली नाही तेव्हा शापोआ कर्मचाऱ्यांनी मासिक 2500 रू.मानधनात जगावे कसे? तेव्हा अश्या वेळकाढू कामगार विरोधी  सरकारला येत्या 2024 मध्ये सत्तेवरून खाली खेचण्याचा व पुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आयटक नी दिला आहे.आंदोलनात गडचिरोली,चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो आशा वर्कर गट प्रवर्तक,अंगणवाडी सेविका मदतनीस,शालेय पोषण आहार कर्मचारी उपस्थित होत्या.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 7, 2024   

PostImage

शेतीवर काम करण्यासाठी गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात ठार


गडचिरोली:-

शेतात कापूस वेचणी करीत असताना वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा (Gadchiroli) मृत्यू झाल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ या गाव शिवारात घडली.

या घटनेमुळे (Tiger) परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये घाबरत पसरली आहे.
सुषमा देवीदास मंडल असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. हि घटना आज सकाळी ११ विजेच्या सुमारास घडली आहे. सुषमा मंडल या महिलेसह काही मजूर गावनजिक असलेल्या शेतात कापूस वेचणीच्या कामासाठी गेले होते. या दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला (Tiger Attack) करत महिलेच्या मानेला पकडून अंदाजे १०० मिटरपर्यंत फरफडत नेले. घटनास्थळी काही महिला सुषमासोबत कापूस वेचणी करीत होते. वाघाने हल्ला केल्याचे बघताच तिथून बाकीच्या महिलांनी पळ काढला.
गावकऱ्यांची धाव

शेतातील महिलांनी गावाकडे धाव घेत गावात घटनेबद्दल माहिती दिली. काही वेळानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता वाघाने महिलेला तिथेच ठार केले असल्याचे दिसून आले. यामुळे आता संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Dec. 31, 2023   

PostImage

विद्युत स्पर्शाने हत्तीचा मृत्यू.!गडचिरोली जिल्ह्यातील पलसगड वाढोणा या परिसरात एका हत्तीचा मृतदेह आढळुन आला आहे. विद्युत स्पर्शाने या हत्तीचा मृत्यू झाला असल्याचे उघड झाले असून तस्करीसाठी हा सापळा लावण्यात आल्याचे ही सांगितले जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यामध्ये ही घटना घडली असून हत्तीच्या अवयवांच्या तस्करीसाठी ही शिकार केल्याचे सांगितले जात आहे. शिकारी आणि तस्करी याचे प्रमाण वाढले आहे. हत्तीच्या दातांची तसेच इतर अवयवांची तस्करी करण्यात येते. या तस्करीसाठी हत्तींच्या शिकारीचे प्रमाण वाढले असून खुले आम वनहत्तींची शिकार केली जात आहे. वनविभाग याला आळा घालण्यासाठी कोणते उपाय करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 31, 2023   

PostImage

Happy new year party: आज थर्टी फर्स्टला होणार कोंबड्या, बकऱ्यांची …


 

गडचिरोली:  म्हणता म्हणता २०२३ हे वर्ष संपण्यास अवघे काही तास उरले असून रविवार ३१ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जल्लोषाचे वातावरण राहणार असून रविवारी मोठ्या प्रमाणात मासांहार केला जात असल्याने कोंबड्या, बकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल होणार असल्याचे बोलल्या जात आहे.

 

आज ३० डिसेंबर रोजी शनीवारी शहरातील मटन व चिकन मार्केटमध्ये फेरफटका मारला असता विशेष गर्दी दिसुन आली नाही. मात्र ३१ डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस असून याच दिवशी रविवारही आला असल्याने रविवारी मटन चिकन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी उसळणार असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. ३१ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात मासांहार केला जात असल्याने चिकन, मटन विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात कोंबड्या, बकऱ्या दुकानात आणुन ठेवल्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे

 

विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील चिकन, मटन बाजारपेठेत प्रतिकिलो २५० पॅरेट रूपये आहे. बायलर २०० रूपये प्रतिकिलो तर कॉकरेल १५० रूपये प्रतिकिलो आहे. गावठी कोंबडीचा दर ५५० रूपये प्रतिकिलो आहे. तसेच बकऱ्याच्या मटनाचा दर ७०० रूपये प्रतिकिलो आहे. यामध्ये कमी अधिक प्रमाणात बदल होऊ शकतो.

 

मात्र हौसेला मोल नसल्याने डिसेंबरला मासाहार ३१ करणाऱ्यांची पावले चिकन, मटन मार्केटकडे वळतील असे बोलल्या जात आहे. यामुळे रविवारी या माध्यमातून लाखो रूपयांची उलाढाल होणार असल्याचे मटन, चिकन विक्रेत्यांची चांदी होणार आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 30, 2023   

PostImage

कविवर्य मिलींद बी. खोब्रागडे रा गडचिरोली ह्यांना "अष्टपैलू काव्यलेखन राज्यस्तरीय …


अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई संस्थेच्या वतीने एक दिवसीय वार्षिक पुरस्कार सोहळा देवाची आळंदी जिल्हा पुणे येथे नुकताच पार पडला. संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या अक्षरमंच राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेच्या संस्थेत सलग सहभागी होऊन सर्वोत्कृष्ट,उत्कृष्ट लेखन केल्याबद्दल मान. मिलींद बी खोब्रागडे, रा.गडचिरोली ह्यांना "अष्टपैलू काव्यलेखन राज्यस्तरीय गौरव पुरस्कार" देऊन सन्मानीत करण्यात आले.

             अनेक पुरस्काराचे मानकरी मान. मिलिंद बी.खोब्रागडे हे एक सामाजिक जाणिवेचे कवी, लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे. कविता, लेख, कथा तसेच अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, प्रथम, द्वितीय, तृतीय उत्तेजनार्थ, भावस्पर्शी क्रमांकाने गौरविण्यात आलेले आहे. दिनांक २४ डिसेंबर २०२३ ला राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात मान.मिलींद बी.खोब्रागडे रा.गडचिरोली ह्यांना अष्टपैलू काव्यलेखन राज्यस्तरीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

          संस्थेचे संस्थापक मा. शिवाजी खैरे सर व अनुसया खैरे मॅडम उपस्थितीत "देवाची आळंदी" जिल्हा पुणे ह्या संतांच्या भूमीत हा सोहळा दिनांक २४/१२/२०२३ रोजी संपन्न झाला. जागतिक किर्तीचे जेष्ठ साहित्यिक मा.डॉ. मधुसूधन घाणेकर यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदरणीय श्री. शिवाजी किसन खैरे सर, मा.सौ.अनुसयाताई खैरे मॅडम मा.श्री अनंत बोरकर, मा.सौ.अलकाताई झरेकर, मा.श्री. विनोद गोल्हार या मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा उत्साहात पार पडला. सर्व मान्यवर व अक्षरमंचचे सर्व कार्यकारी समिती तसेच अनेक राज्यभरातून आलेले सारस्वत, ज्येष्ठ साहित्यिक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वांनी मिलिंद बी.खोब्रागडे यांना यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


PostImage

Rushi Sahare

Dec. 21, 2023   

PostImage

Gadchiroli News - ओबीसी प्रवर्गातील युवक युवती साठी विविध योजना …


गडचिरोली,  दि.21 : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. अंतर्गत ओबीसी प्रवर्गातील युवक युवतींसाठी विविध योजना उपलब्ध असून या योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.  1) थेट कर्ज योजना 1 लाखापर्यंत: या योजनेंतर्गत स्वयंरोजगाराकरीता लघु उदयोग सुरू करण्यासाठी 1 लाखाची बीनव्याजी थेट कर्ज योजना सुरू केली आहे. सदर योजनेत नियमित परतफेड नकरणा-या लाभार्थींना द.सा.द.से 4 टक्के व्याज आकारण्यात येईल व कर्ज परतफेडीची मुदत 4 वर्ष असणार आहे. 2) 20 टक्के बिजभांडवल योजना 5 लाखापर्यंत : या योजनेंतर्गत कमाल मर्यादा रु. 5 लाखापर्यंतच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात येते. कृषी व संलग्न व्यवसाय, वाहतुक क्षेत्राशी संबधीत व्यवसाय तसेच पारंपारीक, लघु व सेवा उद्योगासाठी कर्ज देण्यात येते. नावीन्यपुर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजुरीस प्राधान्य देण्यात येईल. मंजुर कर्ज रक्कमेच्या 5 टक्के लाभार्थी, 20 टक्के महामंडळ व 75 टक्के बँकेचा सहभाग आहे. कर्जाची परतफेड 5 वर्षात करायची आहे. 3) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना 10 लाखापर्यंत : या योजनेचे स्वरुप बँकेने रु. 10 लाख पर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजुर केलेल्या अर्जदाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यानंतर व्याजाची रक्कम (12 टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. 4) गट कर्ज व्याज परतावा योजना 10 ते 50 लाखापर्यंत : या योजनेचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे. नॉन क्रिमीलेअर करीता असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत उमेदवारांच्या गटांकरीता ही योजना असणार आहे. बँकेकडून प्रत्येक गटात कमीत कमी रुपये 10 लक्ष ते जास्तीत जास्त रुपये 50 लक्षपर्यंतच्या मंजुर उद्योग उभारणी करीता आहे. मंजुर कर्जावर 5 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जो कमी असेल ते कर्ज मंजुर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्त्ता भरल्यावर जास्तीत जास्त 12 टक्के व्याज दराच्या आणि रुपये 15 लाखाच्या मर्यादेत एकूण व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. 05) शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना 10 ते 20 लाखापर्यंत : सदर योजना बॅकेमार्फत राबविण्यात येते. इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी / विद्यार्थीनींना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी रु.10.00 लक्ष व परदेशी अभ्यासक्रमासाठी रु.20.00 लक्ष इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल. विद्यार्थीचे वय 17 ते 30 वर्षे असावे व तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता रु.8 लक्ष पर्यंत असावे. अर्जदार 12 वी 60% गुणांसह उत्तीर्ण असावा. बॅकेने उपलब्ध करून दिलेल्या कर्जामध्ये फक्त शैक्षणिक शुल्क पुस्तके व साहित्य खरेदीचा समावेश राहील. परदेशी अभ्यासक्रमासाठी QS च्या रॅकींग 200 च्या आतील व GRE, TOEFL परिक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.इच्छुक उमेदवारांनी योजनेसंदर्भात www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट दयावी, तसेच कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन,आय.टी.आय. येथे संपर्क साधावा, असे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

                                                    


PostImage

Rushi Sahare

Dec. 17, 2023   

PostImage

Gadchiroli News - भिमा कोरेगांव शौयदिन सलामी महोत्सव १ जानेवारीला …


गडचिरोली _ ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन तर्फे भिमा कोरेगांव शौयदिन सलामी महोत्सव ०१ जानेवारी 202४ दुपारी १२ वाजता वैनगंगा नदीघाट ( व्याहाड पुलाजवळ ) आयोजीत करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. विनय बांबोळे , राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिआ शेड्युल कास्ट्स फेडरेशन हे असुन उदघाटक म्हणुन संजय मेश्राम डायरेक्टर रियलस्टार मार्केटिंग , तर स्वागताध्यक्ष गोपालजी रायपूरे , रिपाई अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा , प्रा. मुनिश्वर बोरकर , रिपाई अध्यक्ष गडचिरोली जिल्हा तर दिप . प्रज्वलन लताताई लाकडे नगराध्यक्ष नगर परिषद सावली हे राहणार आहेत. . कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून ठाणेदार अरुण फेगडे गडचिरोली , माजी जि.प. सदस्य अँड. रामभाऊ मेश्राम , अँड. शाताराम उंदिरवाडे , सामाजीक कार्यकर्ते मोहन ठाकरे , अँड. चिळंगे , वंचित चे जिल्हाध्यक्ष बाळू ठेभुर्णे , राष्टवादीचे प्रदेश सदस्य रिंकु पापडकर , राष्ट्रवादी चे युवा जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर , शेकाफेचे जिल्हाध्यक्ष पंडीत मेश्राम ' सामाजीक कार्यकर्ता मिलींद भानारकर ,वचित चे जिल्हा उपाध्यक्ष जि. के. बारसींगे , पो.पा. अनिल खेवले , सहा. वनपरिक्षेत्र अधिकारी जनबंधू पिएसआय ठाकुरदास मेश्राम, सामाजीक कार्यकर्ता प्रितम साखरे ,मुख्याध्यापक जनबंधु मारकबोडी , आदिची उपस्थिती लाभणार आहे. रात्रौ ८ वाजता महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका धम्मदिक्षा वाहुळे लातुर , यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. समता सैनिक दल गोकुळनगर व सावली च्या वतीने सलामी दिल्या जाणार आहे.तरी कार्यक्रमास बहुसंख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक दिलीप गोवर्धन , रुपेश सोनटक्के , हेमंत पा. मेश्राम , अरुण शेन्डे , शरद लोणारे , एन. पी. लाळे , निलकंठ सिडाम , विनोद जांभुळकर , अमोल मेश्राम , चेतन सहारे ' संघरत्न निमगडे ' शेकाफे महिला आघाडीच्या सुमित्रा राऊत यांनी केलेले आहे.


PostImage

Rushi Sahare

Dec. 14, 2023   

PostImage

Gadchiroli News - ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी करू किंवा मरू …


 विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोर कमिटीची बैठक निर्णायक निर्णय घेण्याकरीता व आंदोलनाची मालिका जाहीर करण्याकरीता दि. ०७.१२.२०२३ रोजी नागपूर येथील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या मुख्यालयी झाली व सर्व कोर कमिटीच्या जिल्हा प्रमुखाच्या, महिला आघाडीच्या, जिल्हा समन्वयकाच्या, सर्व पातळीवरील नेत्यांच्या, युवा आघाडीच्या सर्व पदाधिकार्यांच्या व नगर प्रमुखांच्या उपस्थितीत पार पडली.  समितीने मिशन २०२३ अंतर्गत “विदर्भ मिळवू औंदा” ही घोषणा केल्याप्रमाणे ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यास घटनेच्या कलम ३ प्रमाणे केंद्र सरकारला बाध्य करण्याकरीता व निर्णायक लढयाकरीता व संसदेच्या २ जानेवारी पर्यंत सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने व संसदेने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीची घोषणा करावी याकारीता स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीकरीता सातत्याने आंदोलनाचा रेटा लावणारा दबाव गट म्हणून केंद्र सरकारने निर्णय घ्यावा याकरीता ३ आंदोलनाची मालिका जाहीर केली आहे.
    दि. १४.१२.२०२३ रोजी महाराष्ट्र – छत्तीसगड सीमेवरील गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील दुर्गम भागातील बोटेकसा या गावाजवळील रस्त्यावर “रस्ता रोको आंदोलन” केले जाणार आहे.  हे आंदोलन सकाळी १० वाजता सुरु केले जाणार आहे.
    पश्चिम विदर्भातील अकोला-वाशीम जुड्या जिल्ह्यात विदर्भ आंदोलनाची धग व लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने व नागरिकांनी विदर्भ आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी व्हावे व ११८ वर्षापासूनची स्वतंत्र विदर्भ राज्याची सुरु असलेली लढाई ४ वर्ष मुंबई राज्यात राहून व ६३ वर्षे मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्यात राहून नागपूर कराराप्रमाणे मराठी भाषिकांच्या राज्यात २३ % लोकसंख्येच्या आधारावर घटनादुरुस्ती करूनही व घटनेला ३७१ (२) हे अभिवचनात्मक कलम जोडूनही १९९४ पर्यंत ३८ वर्षे वैधानिक विकास मंडळ उशिरा निर्माण करून हक्काचा निधी दिला नाही.  त्यामुळे विदर्भाचे सिंचनाचे ६० हजार कोटी मिळाले नाही.   त्यामुळे १३१ सिंचनाचे प्रकल्प पूर्ण होऊन ३५ लाख एकर जमीन सिंचनाखाली येऊ शकली नाही त्यामुळे पूर्वा-उत्तरा नक्षत्राचा पाउस पडला नाही व पिके करपली व अश्या दुष्काळी स्थितीत सक्तीच्या जप्तीची कर्जाच्या वसुलीची नोटीस आल्यावर अमरावती विभाग व वर्धा जिल्ह्यात जग लाजेस्तव शेतकरी आत्महत्या करून मरू लागले व आतापर्यंत १२ वर्षात ३५ हजार चे वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तसेच सामाजिक आर्थिक प्रश्न असलेला नक्षलवादी  चळवळ ग्रस्त भागही विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व यवतमाळ ५ जिल्ह्यात व त्यातील ३७ तालुक्यात आहे.  २००९ सालच्या निवडणुकीत विदर्भातील ४ आमदार व १ खासदार कमी झालेला आहे.  दरवर्षी २००० ते १३००० बालके व गर्भार माता कुपोषणाने मारतात व चंद्रपूर सह विदर्भात प्रदूषणाचे थैमान आहे व विदर्भ आता ओसाड गावांचा अशांत प्रदेश बनला आहे हे सर्व सत्य त्या जिल्ह्यातील जनतेपुढे मांडण्याकरीता अकोला येथे पश्चिम विदर्भाचा “विदर्भ निर्माण संकल्प मेळावा” दि. २०.१२.२०२३ रोजी बुधवारला घेण्याचे निर्धारित केले आहे.
    डिसेंबरच्या अंतिम आठवड्यात २७.१२.२०२३ ला दुपारी १२ वाजता पासून आमरण उपोषणाला संविधान चौकात विदर्भ आंदोलनातील विराआंसचे नेते एड. वामनराव चटप, दैनिक देशोन्नतीचे प्रमुख संपादक प्रकाश पोहरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजनाताई मामार्डे, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुणभाऊ केदार, युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मुकेश मासुरकर  सह विदर्भातील सर्व प्रमुख सहकारी या आंदोलनात सहभागी होतील व त्याच दिवशी विदर्भातील ११ ही जिल्ह्यात  रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.     
          आज दि :- १३.१२.२०२३ विदर्भ राज्य आंदोलन समिती कोरची तालुक्याची बैठक दुपारी १२ वाजता बिहीटेकला गावं येथे बोटेकसा येथे दि :-१४.१२.२०२३  होणाऱ्या "रस्ता रोको आंदोलना" बाबत पूर्व तयारी ची बैठक पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी बैठकीला युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, कोअर कमेटी सदस्य तात्यासाहेब मत्ते, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र सिंग ठाकूर, उपाध्यक्ष घिसू खुणे पाटील, नागपूर जिल्हा युवा टायगर फोर्स अध्यक्ष पराग वैरागडे, कुरखेडा तालुका अध्यक्ष रामचंद्र रोकडे, शहर अध्यक्ष मुक्ताजी दुर्गे, सोशल मीडिया अध्यक्ष हेमंत कुमार मरकाम, किशोर नरोटे, श्यामलाल गावडे, दिलीप केरामी, कौशल्या काटेंगे, लकेश राऊत, प्रवीण सहारे, मानोराम कुमरे, जगदीश डेहरिया, नेपाल मोरगाये, सरोज सहारे, ज्ञानचंद सहारे, चुनेश्वर मानकर उपस्थित होते.


PostImage

Gadchiroli Varta News

Dec. 14, 2023   

PostImage

'त्या' तिहेरी निघृण हत्याकांडाचा पर्दाफाश,पोलीसांनी केले नऊ आरोपी जेरबंद


'त्या' तिहेरी निघृण हत्याकांडाचा पर्दाफाश,पोलीसांनी केले नऊ आरोपी जेरबंद

 

भामरागड : तालुक्यातील नक्षलदृष्टया अतिसंवेदशिल असणाऱ्या पोलीस मदत केंद्र बुर्गी (येमली) हद्दीतील जंगल व्याप्त मौजा गुंडापुरी येथील शेतशिवारात असणाऱ्या झोपडीत दिनांक 06/12/2023 रोजी रात्रो देवु कुमोटी, वय 60 वर्षे, सौ. बिच्चे देवु कुमोटी, वय 55 वर्षे, कु. अर्चना तलांडी, वय 10 वर्षे या तिघांचीही अत्यंत निर्दयीपणे लोखंडी हातोडा व धारदार सुरीने गळा कापुन हत्या केल्याची बाब गावकऱ्यांच्या निदर्शनास येताच मृतकाचा मुलगा विनु देवु कुमोटी याने दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस स्टेशन आलदंडी येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

एकाच रात्री अज्ञात ईसमांनी तिघांचीही निघृन हत्या केल्याने संपुर्ण गडचिरोली जिल्ह्या हादरला समाजातील सर्वच स्तरातुन सदर घटनेबाबत खेद व्यक्त करुन मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी याकरीता मागणी करण्यात आली. घटनेचे गांभीर्य व तिव्रता लक्षात घेवुन पोलीस अधिक्षक श्री. निलोत्पल यांनी हा गुन्हा जलद गतीने उघड करण्याकरीता गुन्ह्राचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला.  त्यावरुन नव्याने अपर पोलीस अधिक्षक अहेरी या पदाचा पदभार स्विकारणारे श्री. एम. रमेश, उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी, श्री. बापुराव दडस, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक श्री. उल्हास भुसारी यांनी त्यांचे तपास पथकासह पोलीस मदत केंद्र बुर्गी (येमली) येथे तळ ठोकुन सदरच्या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावुन आऱोपींना जेरबंद करण्याबाबत निर्देशीत केल्याने वरिल सर्व अधिकारी हे त्यांचे सहकारी अधिकारी व अंमलदारांसह पोलीस मदत केंद्र बुर्गी (येमली) येथे एकत्रीत येवुन अपर पोलीस अधिक्षक श्री. एम. रमेश यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पाच तपास पथक गठीत करण्यात आले. सदर पाचही तपास पथकांना गुन्ह्याशी निगडीत सर्व बाबींचा सखोल तपास होण्याकरीता वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली.

तपासादरम्यान फिर्यादीने रिपोर्ट देतेवेळी कोणावरही संशय अथवा त्याचे वडीलांचा वाद असल्याबाबतचे नमुद केले नाही परंतु फिर्यादी व त्याचा भाऊ शेतातुन परत येत असतांना अनोळखी दोन ईसमांनी त्याचे परिवारास घातपात करणार असल्याची घटनेच्या दोन दिवस पुर्वी धमकी दिली होती असे  रिपोर्ट दाखल झाल्यानंतर चार दिवसांनी माहीती दिली. सदर बाब अत्यंत महत्वपुर्ण असतांना देखील फिर्यादी किंवा त्याचे कुटु्ंबीयांनी ही बाब लपवुन ठेवल्याने पोलीसांची संशयाची सुई फिर्यादी व मृतकांच्या कुटुंबीयाकडे वळली. मौजा गुंडापुरी येथील पोलीसांच्या गुप्त बातमीदारां मार्फत खात्रीशिर माहीती मिळाली की, मृतक देवु कुमोटी हा या परिसरातील मोठा पुजारी असुन तो जादु टोना करुन अनेक लोकांना आजारी पाडत असल्याने त्या लोकांचा पुढे मृत्यु होतो असा संशय मौजा गुंडापुरीतील व त्या परिसरालगत असलेल्या काही गावांमध्ये होता परंतु पोलीसांच्या तपासात दिसुन आले की, नजिकच्या काळात या परिसरात जे व्यक्ती मृत्युमुखी पडले ते कँन्सर व अन्य गंभीर आजारांनी  ग्रस्त असतांना देखील त्यांचे नातेवाईकांनी त्यांना वैदयकिय उपचार न देता वेगवेगळ्या पुजाऱ्यांकडे नेल्याने त्यांच्या प्रकृतीत जास्त बिघाड होवुन ते मृत्युमुखी पडले परंतु त्या मृतकांच्या नातेवाईकांचा मृतक देवु कुमोटी हा जादु टोना करीत असल्याची धारना असल्याने त्याचे बद्दल प्रचंड प्रमाणात रोष होता त्या संदर्भात गावात यापुर्वी दोन ते तिन वेळा पंचायत बोलावुन त्या पंचायत दरम्यान मृतक देवु कुमोटी यास त्याचेच नातेवाईक असलेल्या परिवाराकडुन समज  देण्यात आली होती.

लोकांच्या आजारपणास देवु कुमोटी हाच कारणीभुत असल्याचे मानुन मृतकाचे मुले 1) रमेश कुमोटी, 2) विनु कुमोटी (फिर्यादी) तसेच त्याचे नातेवाईक 3) जोगा कुमोटी, 4) गुना कुमोटी, 5) राजु आत्राम (येमला), 6) नागेश उर्फ गोलु येमला, 7) सुधा येमला, 8) कन्ना हिचामी सर्व रा. गुंडापुरी, तसेच मृतकाचा जावई 9) तानाजी कंगाली, रा. विसामुंडी, ता. भामरागड, जिल्हा गडचिरोली यांनी कट रचुन मृतक देवु कुमोटी याचे डोक्यावर हातोडीने  जोरदार प्रहार करुन व मृतकाची पत्नी बिच्चे कुमोटी हिचा धारदार सुरीने गळा कापुन निघृन हत्या केली. घटनेच्या दिवशी मृतकाची नात कु. अर्चना तलांडी, रा. मरकल ही मृतकांसोबत असल्याने ती आपल्याला ओळखुन पोलीसांना माहीती देईल या भितीने आरोपींनी मागचा पुढचा विचार न करता तिचा देखील धारदार सुरीने गळा कापुन निघृन हत्या केल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न होताच वरिल नमुद नऊ आरोपींना पोलीसांना अत्यंत शिताफीने जेरबंद केले.

सदर घटना आरोपींनी अत्यंत योजनाबध्द रित्या व थंड डोक्याने केली असुन घटनेतील आरोपी हे मृतकाचे जवळचे नातेवाईक असल्याने त्यांचेवर संशय घेवुन पोलीस तपास करीत असल्याने गावकऱ्यांनी देखील पोलीस यंत्रनेवर सुरवातीस नाराजी व्यक्त केली परंतु पोलीसांनी त्यांचा संयम न सोडता आरोपीतांच्या सर्व बारीक सारीक हालचालींवर पाळत ठेवुन वारंवार संशयतांकडे सखोल विचारपुस सुरु ठेवली त्यावरुन त्यांचेमध्ये बरीच मोठी तफावत दिसुन आल्याने पोलीस यंत्रनेकडुन सर्व गुंडापुरी वासीयांची बैठक घेवुन त्यांना संशयीत आरोपी कसे खोटे बोलुन पोलीसांची व गावकऱ्यांची दिशाभुल करीत आहेत हे पटवुन दिले. आरोपी वेळोवेळी वेगवेगळी माहीती देत असल्याने ते खोटे बोलत असल्याची गावकऱ्यांची देखील खात्री पटली अखेरीस सर्व संशयीत आरोपीतांना ताब्यात घेवुन पोलीसांनी गुन्ह्यासंदर्भाने सखोल विचारपुस केली असता आरोपींनी गुन्ह्या केल्याचे निष्पन्न झाले.

सदर गंभीर व क्लिष्ट स्वरुपाच्या गुन्ह्यात पोलीसांनी अत्यंत संयमाने व सातत्याने तपास करुन गुन्हा उघडकीस आणुन नऊ आरोपींना जेरबंद केल्याने गावकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. 


PostImage

Rushi Sahare

Dec. 12, 2023   

PostImage

Gadchiroli News - माजी विद्यार्थाने माजी शिक्षकांचा केला सत्कार . …


 गडचिरोली _ १0 ते १५ वर्ष सेवानिवृत्त होणारे माजी शिक्षक जे आता मरणाच्या दारापर्यंत पोहचणार अश्या शिक्षकांचा माझी विध्यार्थीनी आमचा सत्कार करून १० वर्ष पुन्हा आमचे आयुष्य वाढविले असे हे आमचे विध्यार्थी जे आता मोठ्या हुद्यावर नोकरीवर असुन तेही नातवापतवाचे धनी आहेत. त्यांच्या सत्कारामुळे आम्ही भारावून गेलोत असे उद्‌गार माजी प्राचार्य जगदिश म्हस्के यांनी सत्काराला उत्तर देताना काढले. शिवाजी हायस्कुल गडचिरोली चे १९९७ च्या बाँच चे माजी विधार्थी आरमोरी रोडवरील हाय फॉर्म गोगाँव लॉन मधे शिक्षक - विद्यार्थी व पालक स्नेहमिलन सोहळा आयोजीत केला होता. यात प्रा. जगदिश म्हस्के , प्रा. पुरुषोत्तम निकोडे ' प्रा. मुनिश्वर बोरकर , प्रा. पि.पी. म्हस्के, ए. टि. म्हशाखेत्री , अरविंद बळी , सुमतीताई मुनघाटे आदि माजी शिक्षकांचा सत्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी मुनिश्वर बोरकर म्हणाले की, माझी विध्यार्थाचा आम्ही शाळेत सत्कार करतो परंतु माझी विद्यार्थांनी माझी शिक्षकांचा सत्कार म्हणजे हा एक अफलातून आनंददायी प्रकारच म्हणावे लागेल. आम्ही शिक्षकच , परंतु आमचे विध्यार्थी कुणी डॉक्टर ' इंजिनिअर , ठेकेदार ' व्यापारी तर कुणी राजकीय क्षेत्रात चमकले यांचा आम्हाला अभिमान वाटतो. याप्रंसगी पि.पी म्हस्के, प्रा. निकोडे , बळी सर यांचेही समायोचित भाषणे झालीत. यावेळी अजय दिवेदी , दिनेश आकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचलन अमोल दशमुखे यांनी तर आभार सुधिर चौधरी यांनी मानले. कार्यक्रमास माजी शिक्षक , विध्यार्थी व त्याचे पालक अमरावती वरून अनिल वाघ , नागपूर चे अजय दिवेदी अर्चना कत्रोजवार , मोहीत दशमुखे यांनी स्वागत गित गाऊन केले, बहुसंख्येने उपस्थित होते.


PostImage

Rushi Sahare

Dec. 10, 2023   

PostImage

Gadchiroli News. - मृदा जलसंधारण मंत्रालय मुंबई चे सचिव सुनील …


Gadchiroli :- चामोर्शी तालुक्यातील विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तिर्थक्षेत्र मार्कंडादेव तेथील मार्कंडादेव मंदिर समुहाला मंत्रालयातील मृदा जलसंधारण सचिव सुनील चव्हाण यांनी  काल शणीवारी भेट दिली त्यांना मार्कंडादेव मंदिरा बद्दल मार्कंडादेव येथी छबिलदास सुरपाम यांनी मंदिर समुहाची संपुर्ण माहीती दिली त्यांच्या सोबत मृदा जलसंधारण चे अधिक्षक अंभीयता नितीन धुसाने,जिला जलसंधारण अधिकार पि.एम.ईगोले, उपविभागीय जलसंधारण अधिकारी अहेरी विभाग महेश कारेंगुलवार, उपविभागीय जलसंधारण अधिकारी अहेरी पुल्लावार,उपविभागीय जलसंधारण अधिकारी चामोर्शी मडावी व जलसंधारण अधिकारी अंकुश दहेलकर,आदि मान्यवर यावेळी ऊपस्थीत होते.


PostImage

Rushi Sahare

Dec. 5, 2023   

PostImage

Gadchiroli News - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना


सन २०२३-२४ अनुसुचित जातीनवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ 

गडचिरोली, : अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकिय वसतीगृहात अर्ज करुन देखील शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता, व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणे करिता शासनाने दि.१३ जुन २०१८ च्या सुधारित शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेणे करिता विद्यार्थ्यांना ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रॉपर जिल्हयाच्या ठिकाणी ५ कि.मी. अंतरावर असलेल्या विविध स्तरातील महाविद्यालयात/शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता १०वी/१२वी/पदवी/पदविका परिक्षेमध्ये ५०% गुण असणे अनिवार्य आहे. तसेच या योजनेचा लाभ घणेकरिता विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत असावे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील) विद्यार्थ्यांना ३ टक्के आरक्षण असेल. दिव्यांग (अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील) विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी ४० टक्के इतकी राहील. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सन२०२३ २४ या शैक्षणिक सत्राकरिता विद्यार्थ्यांनी दि. १५ जानेवारी २०२४ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचेकडे ऑफलाईन अर्ज सादर करण्यात यावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली डॉ. सचीन मडावी, यांनी केले आहे. सदर योजनेचा लाभ घेणेसाठी विहीत अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली या कार्यालयात उपलब्ध आहे. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली यांनी कळविले आहे.